टोकियो : वृत्तसंस्था
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये क्रिकेटच्या सुवर्णपदकासाठी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या २ संघांमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर महामुकाबला रंगणार आहे. त्यामुळे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. सुवर्णपदकाची ही लढत कोण जिंकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही हायहोल्टेज लढत शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता जपानमधील निशिन येथील कोरोगी स्पोर्टस पार्क येथे रंगणार आहे.
भारताने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या दुस-या उपांत्य फेरीत श्रीलंकेचा तब्बल १२४ धावांनी पराभव केला. या दणदणीत विजयासह श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे पाकिस्तानने पहिल्या उपांत्य फेरीत बांगलादेशचा ६ गडी राखून पराभव करत अंतिम सामन्यात स्थान मिळवले. त्यामुळे आता साहिबजादा फरहानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारत यांच्यात सुवर्णपदकासाठी थरारक सामना रंगणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण १७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने तब्बल १४ सामने जिंकले तर पाकिस्तानला फक्त ३ विजय मिळवता आले आहेत. विशेष म्हणजे या २ संघांमधील मागील सहा टी-२० सामन्यांमध्ये भारताने सलग विजय मिळवला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यापूर्वीची ही आकडेवारी निश्चितच भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा टी-२० सामना १५ फेब्रुवारी २०२६ रोजी टी-२० विश्वचषकात झाला होता. श्रीलंकेतील आर. प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने ६१ धावांनी विजय मिळव टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते.















