22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयभ्रष्टाचारी देशांत भारत ९३ व्या क्रमांकावर

भ्रष्टाचारी देशांत भारत ९३ व्या क्रमांकावर

भ्रष्टाचाराचा निर्देशांक, १८० देशांच्या यादीत भारताची रँकिंग गतवर्षीप्रमाणेच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सार्वजनिक क्षेत्रामध्ये पसरलेल्या भ्रष्टाचाराचे सर्वेक्षण घेणारा ‘भ्रष्टाचार निर्देशांक २०२३’ हा अहवाल प्रसिद्ध झाला असून १८० देशांच्या यादीत भारताचा ९३ वा क्रमांक आहे. २०२२ या वर्षीच्या तुलनेत २०२३ मध्ये भारतातील भ्रष्टाचाराच्या प्रमाणात फारसा बदल झाला नसल्याचे दिसून आले आहे. भ्रष्टाचारी देशांत भारताची आघाडी नसली तरी ९३ व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे भ्रष्टाचारमुक्त देशाचा दावा केला जात असताना भ्रष्टाचाराची स्थिती फारशी सुधारली नसल्याचे चित्र आहे.

ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. तज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्र यांच्या मदतीने सार्वजनिक क्षेत्रात भ्रष्टाचार किती प्रमाणात पसरला आहे, याची नोंद या अहवालाद्वारे घेतली जाते. भ्रष्टाचाराचे प्रमाण दर्शविण्यासाठी शून्य ते शंभर या दरम्यान गुणांक दिले जातात. शून्य गुणांक असलेल्या देशात सर्वांत कमी भ्रष्टाचार, तर शंभर गुणांक असलेला देश अत्यंत भ्रष्टाचारी असे समजले जाते.

२०२३ मध्ये भारताला ३९ गुणांक मिळाले होते, तर २०२२ मध्ये ४० गुणांक मिळाले होते. त्यावेळी यादीत भारताचा क्रमांक ८५ होता. गुणांकामधील फरक अत्यल्प असल्याने भ्रष्टाचाराच्या प्रमाणातील बदलाबाबत निश्­िचत काही सांगता येणार नाही, असे अहवालात म्हटले आहे. मात्र, आगामी काळात भारतात येऊ घातलेल्या दूरसंचार विधेयकामुळे मूलभूत हक्कांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी शंकाही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

पाकिस्तान, श्रीलंकेची स्थिती बिकट
आर्थिक अडचणीत सापडलेले पाकिस्तान आणि श्रीलंका हे भारताचे दोन्ही शेजारी भ्रष्टाचार निर्देशांक यादीत अनुक्रमे १३३ व ११५ व्या क्रमांकावर आहेत. कर्जाचा प्रचंड बोजा आणि राजकीय अस्थिरता अशी दोन्ही देशांमधील परिस्थिती आहे. त्यामुळे ही स्थिती चिंताजनक मानली जात आहे. पाकिस्तान तर आर्थिक संकटात आहे. त्यामुळे यातून या देशाला लवकर उभारी मिळणे कठीण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

श्रीलंकेत सुधारणा
दरम्यान, नियोजनबद्ध पावले टाकत असल्यामुळे श्रीलंकेतील परिस्थिती काही प्रमाणात सुधारत आहे. बांगलादेश १४९ व्या क्रमांकावर असला तरी या देशातील आर्थिक विकासाचा वेग चांगला असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे. मागील दशकभरात भ्रष्टाचाराविरोधात कडक धोरण अवलंबिणा-या चीनचा क्रमांकही ७६ वा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR