नवी दिल्ली : चंद्रावर भारताचा झेंडा फडकाविल्यानंतर आता देशातील शास्त्रज्ञ समुद्राच्या तळाशी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारताने ‘समुद्रयान’ मोहीम आखली असून स्वदेश बनावटीची ‘मत्स्य ६०००’ ही खास पाणबुडी समुद्रात खोलवर पाठविण्यात येणार आहे. या यानाची पहिली चाचणी वर्ष २०२४ च्या सुरूवातीला बंगालच्या उपसागरात चेन्नईजवळ होणार आहे. त्यानंतर दोन वर्षांनी २०२६ मध्ये मोहीम प्रत्यक्ष लॉंच होणार आहे.
चेन्नईच्या राष्ट्रीय सागरी तंत्रज्ञान संस्था ‘एनआयओटी’ने मत्स्य-६००० पाणबुडी विकसित केली आहे. ही एक खोल समुद्रातील मोहीम असून ‘ब्ल्यू इकॉनॉमी’ विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून विकसित होत आहे. समुद्रयान ही भारताची मानवी मोहीम असून या मोहिमेमध्ये समुद्राच्या पोटात ६००० मीटर खोलवर ‘मत्स्य’ ६००० ही पाणबुडी पाठवण्यात येईल. या पाणबुडीद्वारे तिथे असलेल्या कोबाल्ट, मँगनीज आणि निकेल सारख्या खनिजांचा शोध घेण्यात येईल. गेल्या दोन वर्षांपासून ‘मत्स्य’ ६००० ही स्वदेशी पाणबुडी तयार करण्याचं काम सुरु होते. समुद्रयान हे पुर्णपणे एक स्वदेशी मिशन असून हे तयार करण्यासाठी टायटॅनियम मिश्र धातुचा वापर करण्यात आला. यात तीन व्यक्तींना १२ तासांपर्यंत समुद्राच्या आत ६ हजार मीटरपर्यंत घेऊन जाण्याची क्षमता आहे. ‘मत्स्य’ ६००० खोल समुद्राच्या शोधासाठी ऑटोनॉमस कोरिंग सिस्टम, ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेईकल आणि डीप सी मायंिनग सिस्टम सारख्या पाण्याखालील विविध उपकरणांनी सुसज्ज असेल.
समुद्राच्या पोटात काय काय?
खोल समुद्रात वायू, पॉलिमेटलिक मँगनीज नोड्यूल, हायड्रो थर्मल सल्फाईड, निकेल व कोबाल्ट यासारखे बहुमूल्य खनिजांचा शोध घेण्यासाठी यान पाठविण्यात येणार आहे. याशिवाय कमी तापमान असलेल्या मिथेनचाही शोध घेण्यात येईल.
भारतासह १४ देशांनाच परवानगी
संयुक्त राष्ट्राने खोल समुद्रात संशोधनासाठी भारतासह केवळ १४ देशांना परवानगी दिली आहे. त्यात अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स आणि चीन या देशांनीच मानवसहित चाचण्यास सक्षम असलेली पाणबुडी विकसित केली आहे.
‘मत्स्य’चे वैशिष्ट्य काय?
– २.१ मीटर व्यास असलेली गोलाकार पाणबुडी.
– ८० मिलीमीटर जाड टायटेनियम मिश्र धातूचा वापर.
– ही पाणबुडी समुद्रात ६,००० मीटर खोलवर जाण्यास सक्षम आहे.
– समुद्रपातळीपेक्षा ६०० पट दाब सहन करू शकते.
– १२-६ तास विनाथांबा काम करू शकते.
– ९६ तास पुरेल एवढा प्राणवायू असेल.
– ३ शास्त्रज्ञांना समुद्रात नेणार.