16.7 C
Latur
Wednesday, November 26, 2025
Homeमहाराष्ट्रभारत-श्रीलंकेत रंगणार टी-२० विश्वचषकाचा थरार

भारत-श्रीलंकेत रंगणार टी-२० विश्वचषकाचा थरार

विश्वचषकाचे १० वे पर्व, भारत-श्रीलंकेतर्फे संयुक्त आयोजन, ७ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने गत २०२४ चा टी-२० विश्वचषक उंचावत जगभरातील क्रिकेट विश्वात आपला दबदबा कायम केला. क्रिकेट चाहत्यांची पंढरी असलेल्या भारतात निवडणुकांप्रमाणेच क्रिकेट स्पर्धांची उत्सुकता पाहायला मिळते. त्यामुळे गतवर्षी चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर आता भारतीय संघाला आणि क्रिकेट चाहत्यांना आगामी टी-२० विश्वचषकाची उत्कंठा लागून राहिली आहे.

आता यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारतात होणार असून ७ फेब्रुवारीपासून टी-२० विश्वचषकाच्या १० व्या पर्वाला सुरुवात होणार आहे. यात हायहोल्टेज लढत असणा-या भारत-पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे तर अंतिम सामना ८ मार्च २०२६ रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.

आयसीसीचे अध्यक्ष जय शाह, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हरमनप्रीत कौर यांच्या उपस्थितीत टी-२० विश्वचषकाच्या वेळापत्रकाची आज घोषणा करण्यात आली. यंदाही विश्वचषक स्पर्धेत एकूण २० संघांचा समावेश असणार आहे. यंदाच्या टी-२० विश्वचषकाचे आयोजन भारत आणि श्रीलंकेच्या वतीने करण्यात येत असून, भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. १० वर्षांनंतर पहिल्यांदाच हा विश्वचषक भारतात आयोजित करण्यात येत आहे.

मुंबईसह दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि अहमदाबाद येथे विश्वचषकाचे सामने होणार आहेत. तसेच श्रीलंकेतील चार ठिकाणांच्या मैदानावरही टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. टी-२० विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमधेच भारत आणि पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाचा एकाच ग्रुपमध्ये समावेश असून ग्रुप ए मध्ये भारत आणि पाकिस्तानसह, अमेरिका नेदरलँड्स आणि नामिबियाचा समावेश आहे.

रोहित विश्वचषकाचा ब्रँड एम्बॅसिडर असणार
पुढील वर्षी फेब्रुवारीत भारत-श्रीलंकेत होणा-या टी-२० विश्वचषकात रोहित शर्मा टी-२० विश्वचषकाचा ब्रँड एम्बॅसिडर असणार आहे. रोहितने जून २०२४ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी याबाबतची माहिती दिली.

भारत-पाकिस्तानमध्ये १५ फेब्रुवारीला सामना
भारताचा पहिला सामना हा अमेरिकेबरोबर असणार आहे. हा सामना ७ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर भारताचा दुसरा सामना नामिबियाविरुद्ध नवी दिल्लीत १२ फेब्रुवारी खेळवला जाणार आहे तर तिसरा सामना १५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानबरोबर खेळवला जाणार आहे. त्यानंतर १८ फेब्रुवारीला भारताचा सामना नेदरलँडस्विरुद्ध अहमदाबादमध्ये होणार आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी ४ ग्रुप
ग्रुप अ : भारत, पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया, नेदरलँडस
ग्रुप इ : ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड, ओमान
ग्रुप उ : इंग्लंड, वेस्ट इंडिज, इटली, बांगलादेश, नेपाळ
ग्रुप ऊ : दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, युएई, कॅनडा

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR