नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेची प्रतीक्षा संपली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात शानदार कामगिरी केल्यानंतर परदेशात छाप पाडण्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज झाली आहे.
दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला टी-२० सामना डर्बनमध्ये होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. मात्र मालिकेच्या सलामीच्या सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात डर्बन येथे होणा-या सामन्यावर पावसाची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, भारत-दक्षिण आफ्रिका पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान ७५ टक्के पावसाची शक्यता आहे.
हवामान अंदाजानुसार रविवारी डर्बनच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सामना सुरू होण्यापूर्वी तसेच सामन्यादरम्यान पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, डर्बनमध्ये तापमान २० अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.
टीम इंडियाने आतापर्यंत डर्बनच्या किंग्समीड क्रिकेट स्टेडियमवर ५ टी-२० सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे टीम इंडियाने यापैकी एकही सामना गमावलेला नाही. या ५ सामन्यांपैकी टीम इंडियाने ४ सामने जिंकले असून १ सामना अनिर्णीत राहिला आहे. २००७ मध्ये भारताने पाकिस्तानचा बाउल आऊटमध्ये ३-० ने पराभव केला होता, हा सामना देखील याच मैदानावर खेळला गेला होता.