ग्लासगो : वृत्तसंस्था
भारताला २०३० च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे (कॉमनवेल्थ गेम्स) यजमानपद मिळाले आहे. बुधवारी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे कॉमनवेल्थ स्पोर्टस एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या बैठकीनंतर अहमदाबादला यजमान शहर म्हणून घोषित करण्यात आले. २०३० ला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. हा शताब्दी सोहळा भारतात आयोजित करण्याची इच्छा कॉमनवेल्थ स्पोर्टने व्यक्त केली होती. पहिली राष्ट्रकुल स्पर्धा १९३० मध्ये हॅमिल्टनमध्ये (कॅनडा) झाली होती.
ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर आज अहमदाबादला अधिकृतपणे यजमान शहर म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे भारत आता २० वर्षांनंतर कॉमनवेल्थ गेम्सचे यजमानपद भूषवणार आहे. यापूर्वी भारताने २०१० मध्ये नवी दिल्ली येथे या कॉमनवेल्थ स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यावेळी भारतीय खेळाडूंनी ३८ सुवर्ण पदकांसह एकूण १०१ पदके जिंकली होती. दरम्यान, कॉमनवेल्थ स्पर्धेचे यजमानपद देण्यासाठी कॉमनवेल्थ स्पोर्टस एक्झिक्युटिव्ह बोर्डाने दोनवेळा गुजरातचा दौरा केला होता. या दौ-यांत त्यांनी अहमदाबादच्या पायाभूत सुविधा आणि तयारीची पाहणी केली.
त्यानंतर अहमदाबाद शहराला कॉमनवेल्थ स्पर्धेचे यजमानपद दिले. या आधी २०१० मध्ये भारतात नवी दिल्ली येथे कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन केले होते. त्यावेळी या स्पर्धांसाठी सुमारे ७० हजार कोटी रुपये खर्च झाले होते. या स्पर्धेत ७१ देशांतील ६०८१ खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यावेळी भारताने १०१ पदके जिंकून इतिहास रचला होता. यात ३८ सुवर्णपदकांचा समावेश होता आणि मागच्या वेळी २०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने ६१ पदके जिंकली होती. या स्पर्धेत ७२ देशांतील ५ हजारांहून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता.
७ जून २०२५ रोजी भारतीय शिष्टमंडळाने लंडन ३ सादरीकरणानंतर सरकारशी चर्चा केली. यानंतर केंद्र सरकारने २०३० च्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी बोली लावण्यास मंजुरी दिली. त्यानंतर २९ ऑगस्ट २०५० रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हर्ष संघवी, पीटी उषा आणि इतर अधिका-यांनी लंडनमध्ये अधिकृत बोली सादर केली. बोलीत अहमदाबादला एक आधुनिक, कॉम्पॅक्ट आणि उच्च-मानक क्रीडा शहर म्हणून सादर केले. त्यानंतर कॉमनवेल्थ समितीने अहमदाबादला यजमानपद घोषित केले.
मल्टी स्पोर्टस इव्हेंट प्रथमच दिल्लीबाहेर
यावेळी प्रथमच मल्टी स्पोर्टस इव्हेंट दिल्लीबाहेर आयोजित करण्यात येत आहे. यापूर्वी भारताने २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्स, १९५१ आणि १९८२ च्या एशियन गेम्सचे यजमानपदही भूषवले आहे. हे तिन्ही मोठे मल्टी-स्पोर्टस इव्हेंट दिल्लीत झाले होते.
आतापर्यंत ९ देशांना यजमानपद
कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन संबंधित देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा, विकास क्षमता, पायाभूत सुविधा आणि दूरदृष्टीचे प्रतीक मानले जाते. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, कॅनडा आणि न्यूझीलंडसह एकूण ९ देशांनी याचे यजमानपद भूषवले आहे. सर्वाधिक ५ वेळा यजमानपद भूषवण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे.
ऑलिम्पिक २०३६ ची दावेदारी मजबूत होणार
कॉमनवेल्थ गेम्स २०३० च्या यजमानपदामुळे ऑलिम्पिक गेम्स २०३६ च्या यजमानपदासाठी भारताची दावेदारी मजबूत होईल. भारत २०३६ च्या ऑलिम्पिक गेम्सच्या यजमानपदाची तयारीही करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून याची घोषणा केली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारताने ऑलिम्पिक गेम्स २०३६ चे यजमानपद मिळवण्यासाठी दावेदारी सादर केली.

