नवी दिल्ली : वृत्तसंस्था
चीन आणि अमेरिका या दोन देशात एआय क्षेत्रात मक्तेदारीवरून स्पर्धा सुरू झाली आहे. यामुळे आता भारतही एआय क्षेत्रात पाऊल ठेवण्याच्या तयारीला लागला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली.
भारत स्वत:च्या मोठ्या भाषेच्या मॉडेलवर म्हणजेच एलएलएमवर काम करत आहे आणि ते १० महिन्यांत तयार होईल. अश्विनी वैष्णव म्हणाले की, आम्ही फ्रेमवर्क तयार केले आहे आणि ते आज लाँच केले जात आहे. आमचे लक्ष भारतीय संदर्भ आणि संस्कृतीशी संबंधित एआय मॉडेल्स तयार करण्यावर असेल.
डीपसीक एआयला २००० ‘जीपीयु’सह प्रशिक्षित करण्यात आले होते, ‘चॅटजीपीटी’ला २५,००० जीपीयु सह प्रशिक्षित करण्यात आले होते आणि आमच्याकडे १५,००० हाय-एंड जीपीयू आहेत. भारतात मजबूत संगणकीय सुविधा आहेत. या आपल्या एआय मिशनला चांगला पाठिंबा देतील.
सरकारने १८,००० जीपीयू असलेली संगणकीय सुविधा तयार केली आहे. ते लवकरच स्टार्टअप्स, संशोधक आणि विकासकांसाठी उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
जीपीयू एवढे का महत्वाचे आहे?
कोणत्याही भाषेच्या मॉडेलला प्रशिक्षित करण्यासाठी उच्च दर्जाचे जीपीयू आवश्यक असतात. मोठ्या भाषा मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी जीपीयू म्हणजेच ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिटचा वापर केला जातो. हे मुळात ग्राफिक्स कार्ड आहेत, पण ते विशेषत: एआयसाठी डिझाइन केलेले आहेत. नॉर्मल ‘जीपीयू’नेही हे काम करता येते पण स्पीडने काम करण्यासाठी याचा वापर केला जातो.