29.3 C
Latur
Tuesday, May 6, 2025
Homeराष्ट्रीयभारत जगातील चौथी अर्थव्यवस्था बनणार!

भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था बनणार!

जपानला टाकणार मागे?, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज, भारताचा जीडीपी ४१८७.०१७ अब्ज डॉलरवर जाणार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताचा जीडीपी २०२५ मध्ये जपानला मागे टाकेल, त्यामुळे भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून जारी करण्यात आलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक आऊटलुक एप्रिल २०२५ मध्ये ही माहिती देण्यात आली. या रिपोर्टनुसार भारताचा नॉमिनल जीडीपी वाढून ४१८७.०१७ अब्ज डॉलर होऊ शकतो. दुसरीकडे जपानच्या जीडीपीचा आकार ४१८६.४३१ अब्ज डॉलर राहण्याचा अंदाज आहे.

भारत सध्या जगातील सर्वांत मोठी पाचवी अर्थव्यवस्था आहे. जीडीपीमध्ये भारतापुढे अमेरिका, चीन, जर्मनी, जपान हे देश आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार येत्या काही वर्षांमध्ये भारत जर्मनीला पिछाडीवर टाकून जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल. २०२७ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल. त्यावेळी भारताच्या जीडीपीचा आकार ५०६९.४७ अब्ज डॉलर्स असेल. त्याचवेळी २०२८ मध्ये भारताचा जीडीपी ५५८४.४७६ अब्ज डॉलर्स असेल. त्यावेळी जर्मनीच्या जीडीपीचा आकार ५२५१.९२८ अब्ज डॉलर्स इतका असेल.

आयएमएफच्या अंदाजानुसार जगातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्था अमेरिका आणि चीन हे दोन देश येत्या दहा वर्षांपर्यंत त्यांचे स्थान कायम ठेवू शकतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २०२५ साठी भारताचा जीडीपी विकास दर ६.२ टक्के इतका केला आहे. जानेवारीच्या आउटलूक रिपोर्टमध्ये हा अंदाज ६.५ टक्क्यांवर होता.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात विकास दरामधील घसरणीचे कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लावण्यात येत असलेल्या टॅरिफमुळे निर्माण होत असलेली अनिश्चितता हे आहे. आयएमएफच्या रिपोर्टनुसार भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. येत्या दोन वर्षांत भारताची अर्थव्यवस्था ६ टक्के विकास दराने वाढत जाणारी एकमेव अर्थव्यवस्था असेल.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख गीता गोपीनाथन म्हणाल्या की, एप्रिल २०२५ च्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूकमध्ये २.८ टक्के जागतिक विकासदराचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यामध्ये १२७ देशांच्या विकास दरातील घसरणीचा समावेश आहे. जो जागतिक जीडीपीचा ८६ टक्के वाटा आहे.

भारत-पाक तणावाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाचा देशातील अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दरावर होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या जीडीपी वाढीचा दर ६.२ टक्के केला आहे. जागतिक बँकेने ६.३ टक्के केला. त्यानंतर मूडीजनेदेखील भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा दर ६.३ टक्के केला आहे.

ट्रम्प टॅरिफचाही बसू शकतो फटका
जागतिक आर्थिक धोरणांशी संबंधित अनिश्चिततेचा परिणाम ग्राहक, व्यापार आणि आर्थिक घडामोडींवर होऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लादण्यात येणा-या टॅरिफचा जगभरातील अर्थव्यवस्थेच्या वाढीवर परिणाम होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR