16.2 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeअंतरराष्ट्रीयभारतीय वस्तूंवर दुप्पट कर लादणार

भारतीय वस्तूंवर दुप्पट कर लादणार

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीचा देशावर काय परिणाम होईल?

वॉशिंग्टन : अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत प्रमुख लढत डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात आहे. डोनाल्ड ट्रम्प यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्या काळात त्यांनी अमेरिकन वस्तूंवर भारताने लावलेल्या करावर अनेकदा टीका केली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या निवडणूक प्रचारात हा मुद्दा उपस्थित केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण राष्ट्राध्यक्ष झाल्यास भारतीय वस्तूंवरील कर दुप्पट करू, असे म्हटले आहे. तसेच, चिनी वस्तूंवरही अधिक कर लादणार असल्याचे ट्रम्प म्हणाल्याने भारतावर आता काय परिणाम होणार हे बघणे महत्वाचे ठरेल.

ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सच्या मते, ट्रम्प टॅरिफचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही. जर ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाले आणि भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या देशांवर नवीन कर लादले तर भारताचा जीडीपी २०२८ पर्यंत केवळ ०.१ टक्क्यांनी खाली जाईल. चीनमध्ये बनवलेल्या वस्तूंवर ६० टक्के कर आणि इतर देशांवर २० टक्के कर लावणार असल्याचे ट्रम्प म्हणाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना भारत खूप जास्त कर आकारतो असेही म्हणाले होते. अहवालानुसार, नवीन कर लागू झाल्यानंतर भारत-अमेरिका व्यापारात थोडीशी घट होईल.

हार्ले डेव्हिडसनवरील वाद
ट्रम्प यांनी हार्ले डेव्हिडसनचे उदाहरण देत सांगितले की भारताने लादलेल्या जास्त करामुळे कंपनी जास्त वाहने विकू शकली नाही. भारत हा सर्वांधिक कर घेणारा देश असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, जे देश अमेरिकन वस्तूंवर जास्त कर आकारतात अशा देशांविरुद्ध आम्ही नवीन कर आणू. २०१९ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दक्षिण आशियाई देशांच्या यादीतून वगळले होते, जे अमेरिकेला शुल्कमुक्त वस्तू पाठवू शकतात. यानंतर भारतानेही अनेक उत्पादनांवर कर वाढवला. गेल्या वर्षी अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. दोन्ही देशांमध्ये सुमारे १२७ अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR