22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयभारतीय लष्कर जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य

भारतीय लष्कर जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य

नवी दिल्ली : जागतिक फायरपॉवर रँकिंगने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. २०२४ साठी जाहीर झालेल्या ग्लोबल फायरपॉवर यादीमध्ये सर्वात मजबूत सैन्याचा तपशील देण्यात आला आहे. या अहवालानुसार, भारताने जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकाचे बलवान सैन्य म्हणून आपले स्थान कायम राखले आहे. भारतीय लष्कर जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे. या यादीत अमेरिका आघाडीवर असून त्यानंतर रशिया आणि चीनचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे पाकिस्तान या यादीत ९व्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, कमी ताकदवान सैन्य असलेल्या देशांमध्ये भूतानचे नाव प्रथम स्थानावर आहे.

जीएफपीच्या मूल्यांकनानुसार, भारताचा पॉवर इंडेक्स स्कोअर ०.१०२३ आहे. (०.०००० चा स्कोअर ‘परिपूर्ण’ मानला जातो). यूएसचा पॉवर इंडेक्स स्कोअर ०.०६९९, रशियाचा ०.०७०२ आणि चीनचा ०. ०७०६ आहे. ग्लोबल फायरपॉवरने १४५ देशांच्या सैन्याची माहिती गोळा केली होती. सैन्याची संख्या, लष्करी उपकरणे, आर्थिक स्थिरता आणि संसाधने यासह ६० क्षेत्रांच्या आधारे त्यांचे मूल्यमापन करण्यात आले. हे सर्व घटक मिळून पॉवर इंडेक्स स्कोअर तयार करतात. शेवटी मिळालेले गुण कोणत्या देशाचे सैन्य किती मजबूत आहे हे सांगतात.

ग्लोबल फायर पॉवरनुसार, ते एखाद्या देशाची लष्करी युनिट्स, आर्थिक स्थिती, क्षमता आणि भूगोल पाहून शक्ती निर्देशांक ठरवते. देशाच्या एकूण फायर पॉवरला पॉवर इंडेक्स म्हणतात. अहवालानुसार, भारतीय लष्कराकडे जवळपास ४,५०० रणगाडे आणि ५३८ लढाऊ विमाने आहेत. १४.४४ लाख सक्रिय सैनिक भारताजवळ असून ही जगात दुसऱ्या क्रमांकाची संख्या आहे. भारताच्या निमलष्करी दलात २५,२७,००० सैनिक आहेत.

‘टॉप’ ५ देश
ग्लोबल फायरपॉवर मिलिटरी स्ट्रेंथ रँकिंग २०२४ च्या यादीत अमेरिकेचे नाव आघाडीवर आहे. यानंतर सध्या युक्रेनसोबत युद्धात असलेल्या रशियाचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनला जगातील तिसर्‍या क्रमांकाचे बलाढ्य सैन्याचा मान मिळाला आहे. त्याचबरोबर या तीन देशांनंतर भारताचे नाव यादीत आहे. दक्षिण कोरिया पाचव्या स्थानावर आहे. याशिवाय ब्रिटन सहाव्या स्थानावर आहे. जपान सातव्या, तुर्की ८व्या, पाकिस्तान ९व्या आणि इटली १०व्या क्रमांकावर आहे.

कमी शक्तिशाली देश
सर्वात कमी लष्करी ताकद असलेल्या देशांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत भूतान प्रथम क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर मोल्दोव्हा आणि तिसर्‍या क्रमांकावर सुरीनाम आहे. त्यापाठोपाठ सोमालिया, बेनिन, लायबेरिया, बेलीझ, सिएरा लिओन, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक आणि आइसलँड दहाव्या क्रमांकावर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR