बंगळुरू : वृत्तसंस्था
चांद्रयान-३ आणि आदित्य एल-१ सारख्या अंतराळ मोहिमांद्वारे भारताने जगाला आपली ताकद दाखवली आहे. गेल्या काही वर्षांत भारताने अंतराळ क्षेत्रात प्रचंड यश मिळवले आहे. चांद्रयान-३ द्वारे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला. पण अंतराळात मानवाला पाठविणे भारताला अद्याप जमले नाही. मात्र, नासा आणि इस्रोने याबाबत संयुक्त मोहीम आखली आहे. त्यासाठी नासा इस्रोला सर्व मदत करणार आहे. या मदतीमुळे २०२४ मध्ये भारतीय अंतराळवीर स्पेस सेंटरवर पोहोचणार असून, अखेरच्या टप्प्यात अंतराळात तिरंगा फडकणार आहे.
अंतराळात जाणारे पहिले भारतीय राकेश शर्मा होते. १९८४ मध्ये त्यांनी ही कामगिरी केली होती. मात्र, अंतराळात मानव पाठविणे भारताच्या अद्याप आवाक्याबाहेर आहे. हेच स्वप्न उरी बाळगून आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो नव्या मोहिमेच्या तयारीला लागली आहे. आता पुन्हा एकदा भारत आपले अंतराळवीर अवकाशात पाठवणार आहे. पुढील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये ही मोहीम हाती घेतली जाणार असून, अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आणि इस्रोचे हे संयुक्त मिशन असेल.
इस्रो आणि नासा येत्या वर्षात महत्त्वाकांक्षी मोहिमेवर काम करणार आहे, अशी घोषणा नासाप्रमुख बिल नेल्सन यांनी मंगळवारी केली. अमेरिका २०२४ च्या अखेरीस भारतीय अंतराळवीरांना प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) पाठवण्याबाबत मदत करेल. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) माध्यमातून अंतराळवीरांची निवड केली जाणार आहे. यामध्ये नासाची कोणतीही भूमिका नसेल. मोहिमेसंदर्भात इतर तपशीलांवर काम सुरू आहे. भारत-अमेरिका अंतराळ सहकार्य वाढविण्यासाठी नासा प्रमुख बिल नेल्सन सध्या भारतात आले आहेत. त्यासंदर्भात त्यांनी ही घोषणा केली.
नासा प्रमुख बिल नेल्सन यांनी चांद्रयान मोहिमचे अभिनंदन करत म्हटले की, भारत हा अमेरिकेचा सर्वांत मोठा भागीदार आहे आणि अंतराळातील अंतराळवीरांशी संबंधित उपक्रमामध्येही भारत चांगला साथीदार आहे. अमेरिका पुढील वर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अनेक खाजगी लँडर्स पाठवणार आहे. पण वस्तुस्थिती पाहता चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरणारा भारत हा पहिला देश आहे. त्यामुळे भारत अभिनंदनास पात्र आहे, असे म्हटले आणि नेल्सन यांनी अंतराळमंत्री जितेंद्र सिंग यांची भेट घेऊन अभिनंदनही केले.
भारतास मदतीस तयार
जर भारताला अंतराळात आपले पहिले स्पेस स्टेशन बनवायचे असेल तर अमेरिका त्यांच्यासोबत काम करण्यास तयार आहे. बिल नेल्सन म्हणाले की, मला वाटते, भारताला २०४० पर्यंत एक व्यावसायिक अंतराळ स्थानक तयार करायचे आहे. भारताला आमच्यासोबत काम करायचे असेल तर आम्ही त्यासाठी सदैव तत्पर आहोत. पण ते पूर्णपणे भारतावर अवलंबून आहे.
निसार महागडा उपग्रह
नेल्सन यांनी अंतराळ मंत्री जितेंद्र सिंग यांना नासाच्या रॉकेटवर भारताच्या पहिल्या अंतराळवीराला आयएएसएसवर पाठवण्यासंबंधी कार्यक्रमाला गती देण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, भारत आणि अमेरिकेची संयुक्त मोहीम असलेला सर्वात महागडा उपग्रह नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार (निसार) पुढील वर्षी प्रक्षेपित केला जाणार आहे. त्याची किंमत एक अब्ज डॉलर्स आहे.