नवी दिल्ली : भारतीय बासमती तांदूळ हा जगातील सर्वोत्तम तांदूळ ठरला आहे. जगातील सर्वोत्तम ६ तांदळाच्या वाणांच्या यादीत भारताच्या बासमती तांदळाला पहिले स्थान मिळाले आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. जागतिक स्तरावर तांदूळ निर्यात करण्यात भारताचा पहिला क्रमांक आहे. आता भारतीय बासमती तांदूळ ‘नंबर १’ ठरला आहे.
फूड आणि ट्रॅव्हल गाईड टेस्ट अॅटलसने जगातील सर्वोत्कृष्ट तांदळांच्या यादीत भारतीय बासमती तांदळाला प्रथम स्थान दिले आहे. या यादीत दुस-या क्रमांकावर इटलीचा अरबोरियो तांदूळ तर, पोर्तुगालचा कॅरोलिनो तांदूळ तिस-या क्रमांकावर आहे. टेस्ट अॅटलसने, जगातील सर्वोत्तम तांदूळ श्रेणीत टॉप-६ तांदळाच्या वाणांना स्थान देण्यात आले आहे. पारंपरिक खाद्यपदार्थ, पाककृती आणि संशोधन यांचा आढावा घेणा-या टेस्ट अॅटलस या फर्मने जगातील सर्वोत्तम तांदळाच्या जातींची यादी जाहीर केली आहे, ज्यात भारतातील बासमती तांदूळ जगातील सर्वोत्तम तांदूळ म्हणून निवडला गेला आहे.
भारतात उत्पादित होणारा बासमती तांदूळ हा प्रीमियम दर्जाचा सुगंधी तांदूळ आहे, ज्याला जगभरात मोठी मागणी आहे.
लोकप्रिय खाद्य आणि ट्रॅव्हल गाईड, टेस्ट अॅटलसकडून भारताच्या बासमती तांदळाला ‘जगातील सर्वोत्तम तांदूळ’ म्हणून गौरवण्यात आले आहे. टेस्ट अॅटलसने २०२३-२४ च्या वर्षअखेरीस यादी जाहीर केली आहे. टेस्ट अॅटलसने बासमती तांदळाबाबत पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘बासमती हा मूळत: भारत आणि पाकिस्तानमध्ये उगवलेला आणि लागवड केला जाणारा लांब आकाराच्या तांदळाचा प्रकार आहे. या तांदळाचे वैशिष्ट्य त्याची चव आणि सुगंध आहे. हा तांदूळ अतिशय पौष्टिक आणि खमंग आहे. एकदा शिजल्यावर, याचे दाणे वेगळे राहतात आणि एकमेकांना चिकटत नाहीत. चांगले आणि सर्वोत्तम बासमती दाणे किंचित सोनेरी रंगाचे असतात.
जगातील सर्वोत्कृष्ट तांदळांची यादी
बासमती : भारत
अरबोरियो : इटली
कॅरोलिनो : पोर्तुगाल
बोम्बा : स्पेन
उरुचिमाय : जपान
भारत तांदळाचा प्रमुख निर्यातदार
तांदूळ निर्यातीत भारत जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारत जगातील सर्वांत मोठा तांदूळ निर्यातदार बनला आहे. या कालावधीत, भारताने विक्रमी २३ दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला आहे, जो जागतिक बाजारपेठेतील एकूण तांदळाच्या ४०.८ टक्के आहे. जगभरातील बासमती तांदळाच्या निर्यातीच्या बाबतीत, भारत ६५ टक्के बासमती तांदूळ निर्यात करतो, तर पाकिस्तान ३५ टक्के बासमती तांदूळ निर्यात करतो.