नवी दिल्ली : मंगळवार, दि. ३० जानेवारी रोजी संध्याकाळी भारतीय क्रिकेटर मयंक अग्रवालबाबत एक मोठी बातमी समोर आली. टीम इंडियाच्या या बॅट्समनला अचानक फ्लाईटमधून उतरवण्यात आले आणि हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्रिपुराविरुद्ध रणजी सामना खेळल्यानंतर मयंक आपल्या कर्नाटक संघासह आगरतळाहून सुरतला जात होता. इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाईटमध्ये त्याच्या सीटवर ठेवलेल्या बाटली त्याने पाणी समजून घेतली. आणि ते प्यायल्यानंतर तो आजारी पडला. यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने तातडीने त्याला विमानातून उतरवून रुग्णालयात नेण्यात आले.
मयंकने पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली आहे. पश्चिम त्रिपुराचे पोलिस अधीक्षक किरण कुमार यांनी पीटीआयला सांगितले की, ‘‘मयंक अग्रवाल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. आता त्याची प्रकृती स्थिर आहे, परंतु या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यू कॅपिटल कॉम्प्लेक्स पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.’’
मयंकच्या मॅनेजरने सांगितले की, तो जेव्हा विमानात चढत होता तेव्हा त्याच्या सीटवर एक बाटली ठेवण्यात आली होती. मग त्याने ते थोडेसे घेतले पण अचानक त्याच्या तोंडात जळजळ सुरू झाली, त्याला बोलता पण येत नव्हते, त्याला आयएलएस हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्याच्या तोंडाला सूज होती. मयंक धोक्याबाहेर आहे पण सूजमुळे तो ४८ तास बोलू शकत नाही, आम्ही आज दुपारी ४ वाजता बंगळुरूला जात आहोत.
त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी सचिव बासुदेव चक्रवर्ती यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, मला फोन आला की मयंक अग्रवाल आपत्कालीन परिस्थितीत दाखल झाला आहे. त्याने आपल्या सीटवर ठेवलेल्या बाटलीतून पाणी प्यायले आणि त्यानंतर त्याचे तोंड जळू लागले. तो धोक्याबाहेर आहे पण त्याचा चेहरा सुजला आहे आणि त्याला बोलताही येत नव्हते. त्याला बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्जही मिळू शकतो, असे ‘क्रिकबझ’ने सांगितले.
अन्य माहितीनुसार, तो सध्याच्या रणजी ट्रॉफीचा पुढील सामना खेळू शकणार नाही. तो कर्नाटक संघाचा कर्णधार असून जबरदस्त फॉर्मात आहे. चार सामन्यांत त्याने दोन शतकेही झळकावली आहेत. मीडिया रिपोर्टस्मध्ये असे म्हटले जात आहे की, पाण्यामध्ये त्याच्यावर विषप्रयोग झाला असावा.