नवी दिल्ली : इंडियन आयडलच्या तिस-या पर्वाचा विजेता गायक आणि अभिनेता प्रशांत तामांग याचे रविवार दि. ११ जानेवारी निधन झाले. वयाच्या ४३ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील राहत्या घरी प्रशांतचा मृतदेह आढळून आला असून, या बातमीने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
प्रशांतचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, अद्याप अधिकृत वैद्यकीय अहवाल येणे बाकी आहे. चित्रपट निर्माते राजेश घटानी आणि प्रशांतचा मित्र अमित पॉल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रविवारी सकाळी प्रशांत तामांग त्याच्या नवी दिल्लीतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. त्याला तात्काळ द्वारका येथील रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या घटनेमुळे त्याचे चाहते आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
पोलिस ते इंडियन आयडल स्टार
प्रशांत तामांग हा मूळचा कोलकाता पोलिस दलात कार्यरत होता. इंडियन आयडल ३ मध्ये सहभागी झाल्यानंतर आपल्या आवाजाच्या जोरावर त्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आणि विजेतेपद पटकावले. गायनासोबतच त्याने अनेक नेपाळी चित्रपटांमध्ये अभिनयही केला होता.

