बंगळुरू : भारतीय फलंदाजांचा आज उपान्त्य फेरीच्या लढतीपूर्वी परफेक्ट सराव झाला.. नेदरलँड्सच्या गोलंदाजांना आज बंगळुरूत चांगला मार बसला. रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर व के. एल. राहुल यांनी फिफ्टी प्लस धावा केल्या. श्रेयसने त्याच्या अर्धशतकाचे शतकात रुपांतर केले आणि वर्ल्ड कपमधील हे त्याचे पहिले शतक ठरले. पाठोपाठ लोकेशनेही शतक पूर्ण केले आणि टीम इंडियाला चारशेपार पोहोचवले.
भारतीय संघाला उपान्त्य फेरीत न्यूझिलंडचा सामना करायचा आहे. अर्थात मायदेशातील वर्ल्ड कपमध्ये भारताने सलग ८ सामने जिंकून दबदबा कायम राखला आहे. आजही नेदरलँड्सविरुद्ध ही मालिका कायम राखतील असेच चित्र आहे. रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी टीम इंडियाला आज नेहमीप्रमाणे दमदार सुरुवात करून दिली. दोघांची १०० धावांची भागीदारी १२व्या षटकात शुभमनच्या (५१) विकेटने तुटली. रोहितने तुफान फटकेबाजी करून अनेक विक्रम आज मोडले, परंतु त्याच्या खेळीला ६१ धावांवर ब्रेक लागला. विराट कोहली व श्रेयस यांच्या ७१ धावांच्या खेळीने डाव सावरला, परंतु नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी सरासरी खाली आणली होती.
५१ धावांवर विराटचा त्रिफळा उडाला आणि बंगळुरूचे स्टेडियम शांत झाले. मात्र, श्रेयसच्या आतषबाजीने ते पुन्हा दणाणले. श्रेयस व लोकेश राहुल यांनीही चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. लोकेशनेही ४० चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि वन डे क्रिकेटमध्ये आघाडीच्या पाच फलंदाजांनी फिफ्टी प्लस धावा करण्याची ही तिसरी वेळ ठरली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने दोनवेळा भारताविरुद्ध असा पराक्रम केला होता. श्रेयसने ८४ चेंडूंत वर्ल्ड कपमधील त्याचे पहिले शतक पूर्ण केले.
वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर शतक झळकावणारा तो पाचवा भारतीय ठरला. लोकेशनेही मग फटकेबाजी करताना शतकाच्या दिशेने वाटचाल केली. ४९व्या षटकात श्रेयसने २५ धावा कुटल्या. लोकेशने ५०व्या षटकाची सुरुवात षटकाराने केली आणि पुन्हा षटकार खेचून ६२ चेंडूंत शतक झळकावले. त्याचेही ही वर्ल्ड कपमधील पहिले शतक ठरले. तो ६४ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह १०२ धावांवर बाद झाला आणि श्रेयससह त्याची २०८ (१२८ चेंडू) धावांची भागीदारी तुटली. श्रेयस ९४ चेंडूंत १० चौकार व ५ षटकारांसह १२८ धावांवर नाबाद राहिला. भारताने ४ बाद ४१० धावा केल्या.