नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेने शुल्क लादल्यानंतर आणि चीनने प्रत्युत्तर दिल्यानंतर जागतिक शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्येही सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात पाच टक्क्यांहून अधिक घसरण झाली. आज कामकाजाच्या सुरुवातीलाच गुंतवणूकदारांचे १९ लाख कोटी रुपये काही मिनिटांतच बुडाले.
ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे भारतीय गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आधीच ४६ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यापासून भारताचे बाजार भांडवल २० जानेवारी रोजी ४,३१,५९,७२६ कोटी रुपयांवरून घसरून ३,८६,०१,९६१ कोटी रुपयांवर आले.
जागतिक स्तरावर अनिश्चिततेमुळे बाजार कमालीच्या अस्थिरतेतून जात आहे. ट्रम्प यांच्या शुल्कामुळे निर्माण झालेली ही अस्वस्थता कशी थांबेल, याची कोणालाच कल्पना नाही. बाजाराच्या या अशांत टप्प्यात, थांबा आणि पहा हीच सर्वोत्तम रणनीती असेल, असं जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट व्ही. के. विजयकुमार म्हणाले. ट्रम्प यांचे अतार्किक शुल्क फार काळ टिकणार नाही आणि जीडीपीच्या टक्केवारीनुसार भारताची अमेरिकेला होणारी निर्यात केवळ दोन टक्क्यांच्या आसपास असल्यानं भारत तुलनेनं चांगल्या स्थितीत आहे आणि त्यामुळे भारताच्या विकासावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. भारत अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार कराराच्या वाटाघाटी करत असून ती यशस्वी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भारतासाठी शुल्क कमी होईल, असे ते म्हणाले.
जागतिक बाजारात हाहाकार
आशियातील इतर देशांमध्ये हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक ११ टक्के, जपानचा निक्केई २२५ जवळपास ७ टक्के, चीनचा शांघाय एसएसई कंपोझिट निर्देशांक ६ टक्क्यांहून अधिक आणि कोरियाचा कोस्पी ५ टक्क्यांनी घसरला. गेल्या आठवड्यात अवघ्या दोन दिवसांत अमेरिकेच्या शेअर बाजारात ५ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त घसरण पाहायला मिळाली.