पर्थ : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर ३-० असा पराभव स्विकारल्यानंतर कोणी विचार देखील केला नव्हता की भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियातील पहिल्याच कसोटी सामन्यात असा दिमाखदार विजय मिळवले. रोहित शर्माच्या गैरहजेरीत भारतीय संघाने जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाला घरच्या मैदानावर अद्दल घडवली. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी महत्त्वाची आघाडी घेतली आहे.
पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात भारताचा डाव फक्त १५० धावात संपुष्ठात आला होता. त्यानंतर कर्णधार बुमराहने सर्व सूत्रे स्वत:च्या हातात घेतली आणि चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी विक्रमी विजय साकारला. भारताने या कसोटी अशी कामगिरी केली आहे जी क्रिकेटच्या इतिहासात कधीच झाली नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया संघाने पर्थ मैदानावर एखादा कसोटी सामना गमवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर धावांचा विचार करता भारताने मिळवलेला हा सर्वांत मोठा विजय आहे. याएदी १९७७ साली भारताने ऑस्ट्रेलियाचा मेलबर्न येथे २२२ धावांनी पराभव केला होता. तर २००८ साली मोहालीत ३२० धावांनी ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती.
ऑस्ट्रेलिया संघाने घरच्या मैदानावर कसोटी मालिकेतील पहिली मॅच गमवण्याची ही फक्त चौथी वेळ आहे. याआधी २००८ आणि २०१६ साली दक्षिण आफ्रिकेने त्यांचा मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव केला होता. तर भारतीय संघाने २०१८ आणि आता यावेळी अशा दोन वेळा त्यांचा पहिल्याच सामन्यात पराभव केला.
पर्थ कसोटी कर्णधार जसप्रीत बुमहारने ७२ धावात ८ विकेट घेतल्या. भारतीय कर्णधारांमध्ये ही चौथ्या नंबरची सर्वोत्तम कामगिरी आहे. बुमराहच्या पुढे बिशन सिंह बेदी आणि कपिल देव आहेत. १९८३ साली कपिल देव यांनी १३५ धावा देत १० विकेट घेतल्या होत्या. तर बंदींनी ७७ साली १९४ धावा देत १० आणि ७६ साली ७० धावा देत ९ विकेट घेतल्या होत्या.