हिंगोली : हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर्णा, पैनगंगा व अन्य नद्यांवर साखळी बंर्धायांची श्रृंखला उभारून या जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यात येईल. सिंचन साखळीतून हिंगोलीचा औद्योगिक विकास करण्यासाठी आमचे शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.
हिंगोली येथील रामलीला मैदानावर ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वेगवेगळ्या योजनांचे हजारो लाभार्थी व जिल्हाभरातून मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. महाराष्ट्रात आतापर्यंत ५ कोटींवर लाभार्थ्यांना ‘शासन आपल्या दारी’ योजनेतून विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये विविध विभागांच्या शासकीय योजनांमधील १४ लक्ष ५२ हजारावर लाभार्थ्यांना जिल्ह्यामध्ये लाभ मिळाला आहे.
हा लाभ ७७४ कोटी रुपयांचा असून, आज यापैकी बहुतेक लाभार्थ्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, सर्वश्री आ. विप्लव बाजोरिया, तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, राजू नवघरे, बालाजी कल्याणकर, विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.