छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
आज आपल्या अवतीभोवती जे सामाजिक आणि राजकीय घडामोडी घडत आहेत, त्या पाहून कधीकधी घुसमट होत आहे. तुम्ही भूमिकेच्या माध्यमातून त्यावर टिप्पणी करू शकता, त्यावर भाष्य करू शकता. हे सर्व कोण करतेय, याची कल्पना तुम्हाला आहे. त्यामुळे मतदान करताना त्यांना मतदानातून प्रत्त्युत्तर द्या, असे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर येथे एमजीएम विद्यापीठात आयोजित सेंट्रल झोन युवा महोत्सव कार्यक्रमात नाना पाटेकर बोलत होते. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु आहेत. तसेच राजकारणात विविध घडामोडी सुरु आहेत. राजकारणातील काही जण आपल्यात जातीपातीवरून दरी निर्माण करू इच्छित आहेत. तुम्हाला माहिती आहे ते कोण आहेत, कसे आहेत, त्यांना प्रत्युत्तर द्यायचे आहे. मतदान करताना त्यांना प्रत्युत्तर द्या, असे नाना पाटेकर म्हणाले.
नाना पाटेकर यांचा रोखठोक स्वभाव आहे. ते राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर रोखठोकपणे भाष्य करतात. काही वेळेला राजकीय नेत्यांवर टीका केल्याने त्यांना राजकीय कार्यकर्त्यांच्या टीकेलाही सामोरे जावे लागते. पण नाना पाटेकर यांना त्यामुळे फार फरक पडत नाही. ते नेहमीच स्पष्टपणे भूमिका मांडतात. त्याची प्रचिती आज पुन्हा आली.
तुम्हीच आता बदल घडवणार
तुम्ही मुले आहात. तुमच्याकडून मी आशा करत आहे. बदल आता तुम्ही आणणार आहात. तुम्हाला सतर्क व्हायला पाहिजे. गर्दीचा भाग बनू नका, असे आवाहनही नाना पाटेकर यांनी केले.

