छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
ऐन दिवाळीच्या तोंडावर गोडेतेल, रवा, मैदा, बेसन, पोहे, गूळ, खोब-यासह डाळींच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. जीवनावश्यक साहित्यांचे दर चांगलेच कडाडले आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींचे बजेट कोलमडले आहे.
दिवाळी सण साजरा करण्यासाठी सर्वचजण उत्सुक असतात. दिवाळी सणात नवीन कपडे, घरी आनंदाचे वातावरण आणि गोडधोड फराळ बनविला जातो. हा गोड फराळ खाण्यासाठी खवय्ये वर्षभर दिवाळीची वाट पाहत असतात. दिवाळीच्या पंधरा ते आठवडाभर आधीच फराळ बनविण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू असते. मात्र, यावर्षी फराळ बनविणा-या गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. दिवाळीत फराळ तयार करायचा की नाही, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे.
याला कारण म्हणजे ऐन सणासुदीच्या व दिवाळीच्या तोंडावर फराळ बनविण्यासाठी जे जिन्नस लागतात त्या गोडेतेल, रवा, मैदा, बेसन, पोहे, गूळ, खोब-यासह डाळींच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याची झळ सामान्य लोकांना बसत आहे. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न गृहिणी व सामान्य लोकांसमोर आहे.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून सर्वसामान्य महिलांना महिन्याला दीड हजार रुपयांची मदत सुरू केली आहे. मात्र, दुसरीकडे महागाई वाढल्याने लाडक्या बहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागली जात आहे. लाडकी बहीण योजना सुरू होण्यापूर्वी खाद्यतेलाचा १४ किलोचा एक डबा १६०० रुपयाला मिळत होता. मात्र, दिवाळी सणाला काही दिवस बाकी आहेत, तोच हा डबा तब्बल २२०० रुपयांवर पोहोचला आहे.
हरभरा डाळ पूर्वी ७० रुपये किलो होती, ती आता ११० रुपयांना मिळत आहे. खोबरेही १२० रुपयांवरून तब्बल २३० रुपये किलो इतके महाग झाले आहे. रवा ३५ रुपयांवरून ४० रुपयांपर्यंत पोहोचला असून, बेसन ८० रुपयांवरून ११० रुपयांपर्यंत वाढले आहे. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. ऐन सणासुदीच्या काळात गोडेतेल, रवा, मैदा यांच्या किमती वाढल्यामुळे गृहिणींनी नाराजी व्यक्त केली आहे.
तयार फराळावर भर
घरोघरी गृहिणींमध्ये फराळ तयार करण्याची लगबग दिसून येते. सध्याचे चित्र मात्र याउलट आहे. महागाईमुळे तेल, तूप, रवा, बेसन यांसह अन्य विविध कच्च्या मालाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. कच्चा माल खरेदी करून फराळ तयार करण्यासाठी येणा-या खचपिक्षा निम्म्या किमतीत तयार फराळ मिळत आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत महागाईमुळे फराळातील पदार्थांच्या वस्तूंचे दरही २५ ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत.
खाद्यतेलाच्या भावात २५ टक्क्यांनी वाढ
खाद्यतेलावर आयात शुल्क आकारल्यामुळे खाद्यतेलाच्या भावात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १०५ ते १२० रुपये किलो असणारा खाद्यतेलाचा भाव १४५ ते १५५ वर पोहोचला आहे. रवा, मैद्यासह खोबरेही प्रचंड महागले आहे. त्यामुळे किराणामाल खरेदी करताना ग्राहक हात आखडता घेत आहेत.