कोल्हापूर : कोल्हापूर शहरात गेल्या सहा महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे कोल्हापूरकर मोठ्या प्रमाणात हैराण झाले आहेत. सातत्याने भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. कुत्रे चावल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण गर्दी करत आहेत. मात्र असे असूनही कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.
यामुळे आता एका २१ वर्षीय निष्पाप मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. सृष्टी सुनील शिंदे असे कुत्र्याने चावा घेतल्याने मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. सृष्टीच्या कुटुंबीयांनी सीपीआरमधील उपचार पद्धतीवर आणि महापालिका प्रशासन कुत्र्यांचा बंदोबस्त करू शकत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापुरातील नागाळा पार्क येथे राहणारी २१ वर्षीय सृष्टी सुनील शिंदे ही ग्राफिक डिझायनर होती. ती ३ फेब्रुवारी रोजी दुपारी कामानिमित्त शनिवार पेठेत जात होती. मात्र, फोन आल्याने ती डॉ. गुणे यांच्या हॉस्पिटलशेजारी मोबाईलवर बोलत थांबली होती. याचवेळी भटक्या कुत्र्याने तिच्या डाव्या पायाचा चावा घेऊन लचका तोडला. सृष्टी गंभीर जखमी झाल्याने तिला स्थानिकांनीच तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले व तिथे तिच्यावर उपचार सुरू होते.
सृृष्टीच्या पायाला गंभीर जखम झाल्याने डॉक्टरांनी उपचार करत टाके घातले होते यानंतर तिला घरी सोडण्यात आले. तसेच वैद्यकीय नियमानुसार रेबीज प्रतिबंधक लसीचे तीन डोस पूर्ण केले. शुक्रवारी तिचा शेवटचा डोस झाला होता. मात्र असे असताना देखील शनिवारी सृष्टीला अचानक ताप आला आणि दोन्ही पायांतील ताकद कमी झाली. यामुळे तिला फॅमिली डॉक्टरांना दाखविले व तातडीने सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.