सोलापूर : सध्या रुग्णांच्या सोयीसाठी स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्याशिवाय आपला रुग्ण लवकर बरा व्हावा, यासाठी नागरिकांनी डॉक्टर आणि प्रशासनाला सहकार्य करावे. रुग्णांना ओपीडीतील डॉक्टरांची माहिती व्हावी, शिवाय जनतेमध्ये शासकीय रुग्णालयातील विश्वास वाढावा, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय हॉस्पिटलमध्ये आता दररोज उपचारासाठी आलेले रुग्ण, त्यातील किती रुग्णांना दाखल करण्यात आले, किती जणांवर ऑपरेशन करण्यात आले, याची महिती स्क्रीनवर दिली जाणार आहे. यासाठी दररोज संध्याकाळी आम्ही एक बुलेटिन काढणार आहोत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.
दररोज छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दीड हजारपेक्षा जास्त रुग्ण उपचारासाठी येत असतात. यातील काही रुग्णांना विविध उपचारांसाठी अॅडमिट केले जातात. शिवाय काहींचे दुसऱ्या दिवशी ऑपरेशनही होतात. अशा सगळ्या रुग्णांची माहिती दररोज स्क्रीनवर दिसणार आहे. यामुळे हॉस्पिटलमध्ये एकूण किती ऑपरेशन झाले, किती पेशंट आले याची माहिती विभागानुसार पाहायला मिळणार आहे, याची प्राथमिक सुरुवात करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विविध विभाग आहेत. कोणत्या विभागात कोणते उपचार करण्यात येतात, तेथे कोण प्रमुख डॉक्टर आहेत, याची माहिती प्रत्येक रुग्णाला व्हावी, यासाठी सिव्हिल प्रशासनाकडून प्रत्येक ओपीडीच्या बाहेर स्क्रीन लावण्यात येत आहेत. या माध्यमातून रुग्णांची सोय होणार आहे. अनेक रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तेथे उपचार कोठे घ्यायचे याचीच माहिती नसते.यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी स्क्रीनची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.