मुुंबई : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आता पाकिस्तानची सर्व बाजूने कोंडी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामध्ये सर्वप्रथम सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर आता भारतीय नेव्हीची ताकद असलेल्या आयएनएस विक्रांत या महाबलाढ्य युद्धनौकेला अरबी समुद्रात उरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जर युद्ध झालंच तर भारत पाकिस्तानला जाणा-या तेलाची अडवणूक करू शकतो आणि पाकिस्तानला ते जड जाण्याची शक्यता असल्याचे मत लेफ्टनंट जनरल मोहन भंडारी यांनी व्यक्त केले.
लेफ्टनंट जनरल मोहन भंडारी म्हणाले की सध्या पाकिस्तानची अवस्था ही बिकट झाली आहे. त्यांच्या लष्करामध्ये दोन गट पडल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत जर पाकिस्तानने युद्धाची घोषणा केली तर ते जास्तीत जास्त सात ते आठ दिवस तग धरू शकतात. दुस-या बाजूनने त्यांना तालिबाननेही आव्हान दिले आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान युद्ध करू शकत नाही.
पाकची तेल कोंडी होणार
लेफ्टनंट जनरल मोहन भंडारी म्हणाले की, पाकिस्तानसाठी सर्वात मोठा मुद्दा आहे तो कच्चे तेल आणि लुब्रिकंटच्या उपलब्धतेचा. पाकिस्तानी लष्कराकडे टँक चालवण्यासाठी आवश्यक प्रमाणात तेल उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत भारताने जर अरबी समुद्राचा रस्ता ब्लॉक केला तर पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते. त्यांच्यासाठी तेलाचा पुरवठा बंद होईल. यामध्ये आयएनएस विक्रात मोठी भूमिका बजावू शकते.
कोंडी सुरूच
विविध मार्गांनी कारवाई करत भारत आता पाकिस्तानच्या कोंडी करण्यासाठी सज्ज झाला आहे. पाकिस्तानी विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करण्याचा विचार नवी दिल्लीमध्ये केला जात आहे. त्यामुळे पूर्वेकडे जाणा-या पाकिस्तानी विमानांना चीन, श्रीलंकेला वळसा घालावा लागणार आहे. भारताच्या बंदरांवरही पाकिस्तानी जहाजांना बंदीची शक्यता आहे. व्यापारी जहाजांना प्रवेशबंदी करून पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारत पावले उचलत आहे.
राजधानी वाचवण्यासाठी पाकची धावपळ
राजधानी इस्लामाबाद वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावपळ सुरू आहे. पाकिस्तानने इस्लामाबाद-लाहोर हवाईहद्द बंद केली आहे. पाकिस्तानी वायुदलाकडून नोटीस टू एअरमेन जारी करण्यात आले आहे. त्यामुळे लाहोर ते इस्लामाबादवरून कोणत्याही देशाच्या नागरी विमानाला उड्डाणास बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही देशाच्या लष्करी विमानांनाही लाहोर ते इस्लामाबाद उड्डाणबंदी करण्यात आली आहे. ही उड्डाणबंदी २८ ते ३० एप्रिल दरम्यान लागू असणार आहे.