यवतमाळ : प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील वणीमधल्या सभेसाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरमधून बाहेर पडताच निवडणूक अधिका-यांकडून त्यांची बॅग तपासण्यात आली आहे. दरम्यान, बॅग तपासताना उद्धव ठाकरेंनी निवडणूक अधिका-यांना काही सवाल केले आहेत.
उद्धव ठाकरे निवडणूक अधिका-यांना म्हणाले, माझी बॅग तपासत आहात, बरोबर आहे. माझ्या अगोदर तुम्ही कोणाची बॅग तपासली? माझा इथे पहिला दौरा आहे. पण माझ्या दौ-यापूर्वी कोणत्या राजकीय नेत्याची बॅग तुम्ही तपासली आहे. तुम्ही चार महिन्यांत एकाचीही बॅग तपासली नाही म्हणत आहात. मीच तुम्हाला पहिल्यांदा सापडलो. माझी बॅग तपासा. मी तुम्हाला अडवत नाही. आतापर्यंत तुम्ही मिंधेंची बॅग तपासली का? देवेंद्र फडणवीसांची बॅग तपासली का? मोदी आणि अमित शहांची बॅग तपासली का? ते इथे आले तर त्यांची बॅग तपासल्याचा व्हीडीओ मला पाठवायचा आहे. मोदींची बॅग तपासतानाचा व्हीडीओ मला आला पाहिजे. तिथे तुम्ही शेपूट घालू नका. हा व्हीडीओ मी रिलीज करत आहे. माझे युरीन पॉट पण तपासा.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, हे लोक कोणत्या शासकीय नोकरीत आहे. हे देखील पाहून घ्या. या बॅगेतील काही पाहिजे असेल तर घ्या. तुम्हालाही तहान लागली असेल. तुम्ही पण माणसे आहात. युरीन पॉट वगैरे काही तपासायची आहे का? असा सवालही ठाकरेंनी केला. याशिवाय उद्धव ठाकरेंनी कॅमरामनला प्रश्न केले आहेत. तुम्ही मध्य प्रदेशचे आहात. गुजरातचे तर नाहीत. म्हणजे बॅगा तपासण्यासाठी देखील बाहेरच्या राज्यातील माणसे आहेत, असेही ठाकरे म्हणाले.
मोदी आणि अमित शहांचीही बॅग तपासा
बॅग तपासण्यात आल्यानंतर झालेल्या सभेतही बॅग तपासणीच्या मुद्याला ठाकरेंनी हात घातला. माझी बॅग तपासली तशी मोदी आणि अमित शहांचीही बॅग तपासा, असे थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला दिले आहे. तसेच मिंधे आणि टरबूज यांचीही बॅग तपासणार का, असा सवाल देखील त्यांनी आयोगाला केला.