कोल्हापूर : महाराष्ट्रात इतकी राजकीय अस्थिरता यापूर्वी कधीही आली नव्हती. आताच्या परिस्थितीला कोल्हापुरातूनच प्रतिकार होऊ शकतो हे आपल्या सगळयांना माहिती आहे. आपल्याला तलवार घेऊन लढाईला जायचे नाही मात्र विचाराची लढाई विचाराने लढायची आहे.
काय बरोबर आहे काय चुकीचे आहे हे आपल्याला समजले असेल तर ते बदलण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, असे प्रतिपादन छ.शाहू महाराज यांनी केले. काँम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार शरद पवारही उपस्थित होते.
शाहू महाराज म्हणाले, सर्व उद्योगधंदे गुजरातमध्ये जात आहेत आणि महाराष्ट्राच्या वाट्याला शेपटीचा तुकडा टाकला जातो. महाराष्ट्रात इतकी अस्थिरता यापूर्वी कधीही आली नव्हती. प्रत्येकाने ठरवले पाहिजे की, घटनेला साथ द्यायची आहे की घटना गाडून टाकणा-याना साथ द्यायची. विचाराने आपण एक राहिलो तर आपण कुणालाही तोंड देऊ शकतो, भविष्य काळात रणांगण सुरू होणार आहे. पक्षांतर बंदी कायदा मधून पळवाटा काढल्या जात आहेत त्यामध्ये दुरुस्ती करणे गरजेचे आहे. पक्षांतर का होतात? त्याची कारण काय आहेत याची कारण सर्वांनाच माहिती आहेत.
शाहू महाराज पुढे बोलताना म्हणाले, आधुनिक काळात शाहू महाराज यांचे समतेचे विचार पानसरे यांनी आत्मसाथ केले. आज आपण एका वेगळ्या कार्यक्रमासाठी आलो आहे. गोरगरीब जनतेसाठी पानसरे काम करत राहिले. शिवाजी महाराज कोण होते हे सर्वसामान्य नागरिकांना समजवून सांगितले. पानसरे यांचे विचार ऐकायला आवडत होते. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या लागोपाठ सिरीयल हत्या झाल्या. मात्र यांचे धागेदोरे अजून सापडले नाहीत, अशी खंतही शाहू महाराजांनी यावेळी बोलून दाखवली.