22.2 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeमहाराष्ट्रआरोपींची वकिली करण्यापेक्षा मुख्यमंत्रिपदाला न्याय द्या

आरोपींची वकिली करण्यापेक्षा मुख्यमंत्रिपदाला न्याय द्या

नाना पटोलेंची फडणवीसांवर टीका

मुंबई (प्रतिनिधी): भाजप युती सत्तेवर आल्यापासून तीन पक्षांत मलईसाठी मारामारी सुरू आहे. सरकारमध्ये गम्मत -जम्मत सुरू असून दररोज एका मंत्र्यावर गंभीर आरोप होत आहेत. हिवाळी अधिवेशनात बीड आणि परभणीतील घटनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे उत्तर दिले त्यातून चित्र स्पष्ट झाले. एखादा निष्णात वकील जसा आरोपीला वाचवण्याचे काम करतो तेच काम मुख्यमंत्री यांनी केले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत नसल्याने राज्य पेटले आहे. यामुळे फडणवीस यांनी वकिली सोडून मुख्यमंत्रिपदाला न्याय देण्याचे काम करावे, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरूवारी दिला.

नाना पटोले यांनी आज टिळक भवन येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सरकारवर जोरदार टीका केली. सरकारमध्ये परिस्थिती भयावह असून सरकारला लाडक्या बहिणीची चिंता नाही. लाडक्या बहिणींचे पती शेतकरीही आहेत आणि हा शेतकरी दररोज आत्महत्या करत आहे. सरकार सोयाबीनला ६ हजार रुपयांचा भाव देणार होते; पण ३ हजारांचाही भाव मिळत नाही. धान, कांदा, कापसाची स्थितीही अशीच आहे. भावांतर योजना लागू करून फरक देण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? असा सवाल पटोले यांनी केला.

सरकार फक्त जनतेला लुटण्यासाठी सत्तेत आले आहे. भाजप युती सरकारमध्ये ६५ टक्के मंत्री कलंकीत आहेत. दररोज महाराष्ट्राची प्रतिमा खराब केली जात आहे. बीड जिल्ह्यातील भ्रष्टाचाराची प्रकरणे दररोज उघड होत असून तीच परिस्थिती पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदारच भ्रष्टाचार झाल्याचे उघड सांगत आहेत. मागील अडीच वर्षापासून हेच सुरू आहे. शेतक-यांच्या योजनेत ४ टक्के भ्रष्टाचार होतो हे मंत्र्यांनीच सांगितले आहे, याकडे पटोले यांनी लक्ष वेधले.

सत्ताधारी पक्षाचा आमदार पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे सांगतो. कृषिमंत्र्यांनीही भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले. पीक विमा घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीनेही भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार जर घोटाळा झालाच नाही, असे म्हणत असतील तर ते धादांत खोटे बोलत आहेत. त्यांनी खोटे बोलू नये, कशासाठी ते खोटे बोलत आहेत? असा प्रश्न विचारून अजित पवार यांनी शेतक-यांच्या डोळ्यातील अश्रू आणि शेतक-यांच्या विधवा पत्नीच्या कपाळावरचे कुंकू विसरू नये, असे नाना पटोले म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR