सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा ऑनलाइन पद्धतीने सध्या सुरू असून, आंतरजिल्हा बदली पोर्टलवर अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पोर्टलवर संवर्ग एक व संवर्ग दोनमध्ये अर्ज दाखल करताना जी कागदपत्रे सादर केली आहेत, त्या कागदपत्रांची तपासणी मुख्य कार्यकारी अधिकारी दोन दिवसांत करणार आहेत.
दरम्यान, त्यानंतर आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांची अंतिम संख्या ठरेल व त्यानंतर पोर्टल रन होऊन अगोदर २०२२ मध्ये अर्ज केलेल्या प्रतीक्षाधीन शिक्षकांच्या बदल्या होतील व नंतर २०२३ मध्ये अर्ज
केलेल्या शिक्षकांच्या बदल्या होतील. जानेवारी महिन्यात राज्यातील ७ हजार शिक्षक आंतरजिल्हा बदलीने एकही रुपया खर्च न करता ऑनलाइन पद्धतीने आपल्या स्व:जिल्ह्यात अथवा आवडीचा पर्याय दिलेल्या जिल्ह्यात रुजू होतील. त्यानंतर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
आता आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षक आता पोर्टलवर यादी प्रसिद्ध होण्याची वाट पाहत आहेत. २०२२ मध्ये अर्ज भरलेल्या शिक्षकांना संवर्ग बदलण्याची संधी न मिळाल्याने व संपूर्ण फॉर्म एडिट करण्याची संधी न मिळाल्याने अनेक शिक्षकांची बदली चुकीच्या पद्धतीने होणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले. तसेच बदलीमध्ये २०२२ मध्ये अर्ज केलेल्या शिक्षकांना प्रथम प्राधान्य दिल्याने २०२३ मध्ये अर्ज केलेल्या शिक्षकांच्या फारच कमी प्रमाणात बदल्या होणार असल्याचे समजते.
२१ जूनच्या शिक्षण विभागाच्या शासन निर्णयामुळे राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या बंद करण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात शिक्षक सहकार संघटनेने आंदोलन केल्यानंतर राज्य शासनाने या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याची प्रक्रिया सुरू केली. याबद्दल राज्य शासनाचे राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, राज्य सरचिटणीस नीलेश देशमुख, जिल्हाध्यक्ष रविराज खडाखडे यांनी आभार मानले.