मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात एकही गृह प्रकल्प न राबविलेल्या चढ्ढा नावाच्या खासगी विकासकाला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली राज्य सरकारने बिनव्याजी ४०० कोटी रुपये मंजूर केले. हा निर्णय म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीवर जाता-जाता घातलेला दरोडा आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी केली त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार नंतर मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना महाराष्ट्रात राबवणार आहे का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
गृह निर्माण विभागाचा विरोध डावलून राज्य सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली मे. चढ्ढा डेव्हलपर्स आणि प्रमोटर या कंपनीला सोलापूर येथे गृह निर्माण प्रकल्प राबविण्यासाठी ४०० कोटी रुपये बिनव्याजी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. गृह निर्माण विभागाने असा निधी देण्यास विरोध दर्शविला असतानाही त्या नंतरही हा निधी देण्यासाठी कोण दबाव आणत आहे? याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
दिल्लीस्थित कंपनीवर ही मेहेरनजर दाखविण्याचा निर्णय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मान्य आहे काय? २०२१ मध्ये या विकासकाशी म्हाडाने करार केला मात्र विकासकाने आतापर्यंत एकाही घराचा ताबा लाभार्थ्याना दिलेला नाही. असे असताना त्याला ४०० कोटींची खिरापत का वाटली जात आहे? असे सवाल वडेट्टीवार यांनी केले. सीबीआयने कारवाई केल्यावर तुरूंगात गेलेला डिम्पल चढ्ढा हा बांधकाम व्यावसायिक राज्य सरकारचे पैसे घेऊन परदेशात पळून गेला तर? अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.
बार्टीच्या विद्यार्थ्यांना २ वर्षापासून शिष्यवृत्ती नाही. विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली तरीदेखील सरकारला जाग येत नाही. सरकारची विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यायची मानसिकता नाही. कारण कमिशन, टक्केवारी जिथे मिळत नाही तिथे सरकार पैसे खर्च करीत नाही. अशी या सरकारच्या कामाची पद्धत आहे. महाज्योती आणि सारथी या संस्थांच्या विद्यार्थ्यांचीदेखील अशीच परिस्थिती असल्याची टीका करीत वडेट्टीवार यांनी या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची मागणी केली.
दरम्यान, विदर्भात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. गडचिरोली, चंद्रपूर येथील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. नागपूर परिसरातदेखील अशीच परिस्थिती आहे त्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या निवारा, जेवण, आरोग्याची व्यवस्था करावी. पशुधनदेखील अडचणीत सापडले असून ते वाचविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर राज्य सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत करावी, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी या वेळी केली.