बंगळुरु : हॉटेलमध्ये थांबलेल्या एका आंतरधर्मीय जोडप्याला सहा ते सात जणांच्या टोळक्याने मारहाण केली आहे. कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातील ही घटना आहे.
आरोपींनी सदर घटनेचा व्हिडिओ शूट करुन व्हायरल केला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी याप्रकरणी कारवाई केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदू मुलगा आणि एक मुस्लिम मुलगी हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी सहा ते सात मुस्लिम तरुण खोलीमध्ये शिरले आणि त्यांनी जोडप्याला मारहाण सुरु केली.
पोलिसांनी सांगितले की सध्या तिघांना अटक करण्यात आली असून आणखी तीन ते चार जणांना लवकरच अटक करण्यात येईल. आरोपी हे स्थानिक रहिवासी असून त्यांचा कोणत्याही संघटनेशी संबंध नाही. याप्रकरणात अपहरण, विनयभंग, महिलेवर अत्याचार आणि हत्येचा प्रयत्न या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे एसपी कुमार यांनी सांगितले.
माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबियांनी याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर हानागल पोलिसांनी अफताब मकबुल अहमेद चंद्रनकत्ती (२४), सामाईउल्ला लालानवर (२३) मोहम्मद इझाक मंजदाक्की (२३) यांना अटक केलीे. याप्रकरणावरुन राजकारण तापू लागले आहे. माजी मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांनी यावरुन सरकारवर टीका केली. महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे म्हणत मुख्यमंत्री सिद्दरामय्या आता गप्प का असा सवाल त्यांनी केला.