नागपूर : महाराष्ट्रातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाला ‘इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी तारे पाहण्याचा आनंद मिळवण्यासाठी मानवी वस्तीपासून दूर जावे लागू नये आणि आकाश निरीक्षणासाठी राखीव जागा आणि उद्याने तयार व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन’ ची स्थापना करण्यात आली. याच संस्थेने पेंच व्याघ्र प्रकल्पाला भारतातील पहिले ‘डार्क स्काय पार्क’ होण्याचा मान दिला.
पेंच व्याघ्र प्रकल्पाकडून गेल्या काही वर्षात रात्रीच्या आकाशाचे सौंदर्य जपण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे ‘इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन’ने ही मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता व्याघ्र प्रकल्पातील काही भागांमध्ये कृत्रिम प्रकाशामुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करून आकाश न्याहाळणा-यांसाठी पोषक वातावरण तयार करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. डार्क स्काय पार्क म्हणजे असे क्षेत्र आहे, जिथे फक्त नैसर्गिक प्रकाश असेल, कृत्रिम प्रकाशाचा अभाव असेल आणि त्या ठिकाणची हवा प्रदूषणमुक्त असेल. ज्यामुळे आकाश सहज न्याहाळता येईल. यात कोणताही बदल होऊ नये यासाठी या भागात प्रयत्न केले जातील. असा परिसर आकाश निरिक्षणसाठी उत्तम म्हणून जाहीर केला जातो आणि त्याच भागाला डार्क स्काय पार्क असे म्हणतात.
पेंच व्याघ्र प्रकल्पातील ‘डार्क स्काय पार्क’ हा आशियातला पाचवा प्रकल्प असून याआधी आशिया खंडात जपान आणि दक्षिण कोरियामध्ये असे प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. ‘इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन’ने पेंच व्याघ्र प्रकल्पाला दिलेल्या मान्यतेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या व्याघ्र प्रकल्पाचे नाव कोरले जाणार आहे.