सोलापूर : शहरातून पोलिस कर्मचा-याची स्कॉर्पिओ चारचाकी गाडी चोरून नेणा-या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यास विजापूर नाका पोलिसांना यश आले असून या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे. अजूनही एकजण फरार असून दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.
रमेशकुमार प्रभुराम बिश्नोई (वय २५, रा. घर नं. १६४, मासोई की ढाणि सिया, ता. सांचौर, जि. जालीर, राजस्थान) आणि रूपाराम मनाराम बिश्नोई (वय ३२, रा. पुनासा, ता. भिनमाल, जि. जालौर, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस कर्मचारी आण्णाराव म्हेत्रे (रा. संत तुकाराम नगर, विजापूर रोड, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ जानेवारी रोजी आण्णाराव म्हेत्रे यांनी त्यांची स्कॉर्पिओ गाडी क्र. एमएच १३ डीवाय ५७१९ ही गाडी चोरीस गेल्याबाबत दिलेल्या फिर्यादीवरुन विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना विजापूर नाका पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणचा डम्प डाटा काढून त्याचे तांत्रिक विश्लेषण करून राजस्थान येथून रमेशकुमार बिश्नोई व रूपाराम बिश्नोई या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीची एमएच १३ डीवाय ५७१९ क्रमांकाची स्कॉर्पिओ चारचाकी गाडी तसेच गुन्ह्यात वापरलेली हुंदाई क्रेटा क्रं. जीए ०९ बीके ११२३ ही चारचाकी गाडी जप्त केली.
ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे, सहायक आयुक्त यशवंत गवारी, पोलिस निरीक्षक दादा गायकवाड, संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार गायकवाड, हवालदार सचिन हार, गणेश शिर्के, शंकर भिसे, अमृत सुरवसे, राहुल विटकर, संतोष माने, समाधान मारकड, सद्दाम आबादीराजे, स्वप्नील जाधव, रमेश कोर्सेगाव, हरिकृष्ण चोरमुले, अयाज बागलकोटे, अर्जुन गायकवाड यांनी केली.
या गुन्ह्याचा तपास करताना विजापूर नाका पोलिसांनी सोलापूर ते राजस्थान दरम्यानचे सुमारे १३५ सीसीटीव्ही कॅमे-याचे फुटेज आणि १२ ठिकाणचा डम्प डाटा काढून त्याचे तांत्रिक विश्लेषन करून राजस्थान येथून आरोपींना ताब्यात घेतले. या गुन्हेगारांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली आहे.