निलंगा : प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील औराद शहाजीनी ते ताडमुगळी ममदापूर आंतरराज्य जाणा-या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याने बांधकाम खात्याची त-हाच न्यारी असून आंधळं दळतंय अन कुत्र पीठ खातय या उक्तीप्रमाणे अवस्था झाली आहे. यामुळे शासनाच्या कोटयावधी रुपयाच्या विकास निधीचा बट्ट्याबोळ केला जात असल्याचा संताप नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. या रस्ता रुंदी करण्याच्या कामात मुरूमा ऐवजी काळ्या मातीचा सर्रास वापर केला जात असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी चेरी मेरीच्या नादात डोळ्यावर पट्टी बांधून आंधळे असल्याचे सोंग घेत असल्याचे नागरिकांतून चर्चिले जात आहे.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी ते ताडमुगळी मार्गे ममदापूर जाणा-या आंतरराज्य रस्त्याचे सात किलोमीटरचे रुंदीकरणासह सुधारणा करण्याचे काम चालू आहे. हा प्रमुख जिल्हा मार्ग लातूर व बिदर या दोन जिल्ह्यांना जोडणारा मार्ग ४८ आहे. या रस्त्याची रुंदी १२ फूट (३.७०) वरून १८ फूट (५.५०) इतकी करण्यात आली आहे. याकरिता १३ कोटीची प्रशासकीय मान्यता असून ९.७१ कोटीचे हे काम आहे. सदर काम एन. आर. काळे लातूर या ठेकेदारा मार्फत करण्यात येत आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर चालू आहे. सदरील कामात रस्त्याच्या दुतर्फा रुंदीकरणासाठी मुरूमाचे अस्तरीकरण, जीएसबी चे खडीकरण, खडीकरणाचे दोन थर व डांबरीकरण तसेच रस्ता दुभाजक व पुलाचे काम अंदाजपत्रकात समाविष्ट आहे.
सद्यस्थितीत रुंदीकरणाचे काम प्रगतीत आहे. मात्र सार्वजनिक विभागातील अधिका-यांच्या कृपाशीर्वादाने या कामात मुरूमाऐवजी चक्क काळया मातीचा वापर करून रुंदीकरणाचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सर्रासपणे चालू आहे. एकीकडे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे मतदार संघाच्या विकासाकरिता कोटयावधी रुपयाचा विकास निधी शासन दरबारी पाठपुरावा करून आणत आहेत. मात्र सांबा विभागाच्या अधिकारी व ठेकेदाराच्या संगणमताने निकृष्ट दर्जाचे कामे करून शासनाच्या कोटयावधी रुपयाच्या विकास निधीचा बट्ट्याबोळ करत असल्याचे विदारक चित्र निलंगा तालुक्यामध्ये पाहावयास मिळत आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामाची तात्काळ चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी नागरिकातून केली जात आहे. निलंगा तालुक्यामध्ये निकृष्ट दर्जाची कामे करणा-या अशा ठेकेदारावर सांबा विभागाकडून कार्यवाही करण्यात येणार का? याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.