22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्ररक्त चाचणीच्या फेरफारात आईचाही समावेश

रक्त चाचणीच्या फेरफारात आईचाही समावेश

आरोपीच्या जागी आईने दिले रक्त

पुणे : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात अल्पवयीन आरोपी, त्याचे वडील आणि आजोबा सध्या अटकेत आहेत. पण या प्रकरणात आरोपीच्या आईचाही समावेश असल्याची बाब समोर आली आहे. १७ वर्षीय आरोपीच्या आईने मुलाचे रक्त नमुने बदलण्यासाठी स्वत:चे रक्त ससून रुग्णालयाला दिले असल्याचे पोलिसांमधील सूत्रांनी सांगितले आहे.

रक्त नमुने बदलण्यामध्ये डॉ. श्रीहरी हळनोरचा प्रमुख सहभाग होता. हळनोरनेच आईचेही रक्त नमुने घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, ज्यावेळी रक्त चाचणी घेण्यासाठी रक्त घेतले गेले, तेव्हा आरोपीच्या आई रुग्णालयात हजर होत्या. डॉ. अजय तावरे आणि डॉ. हळनोर यांच्या अटकेनंतर त्या बेपत्ता झाल्या आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघातप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नुमन्यामध्ये फेरफार झाल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, डॉ. गजानन चव्हाण आणि छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुधीर चौधरी यांची समिती गठित केली होती. या समितीने बुधवारी दुपारी आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे सादर केला. या अहवालात ससून रुग्णालयाचे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख व प्राध्यापक डॉ. अजय तावरे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्याविरोधात कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR