33.5 C
Latur
Friday, May 9, 2025
Homeक्रीडाआयपीएलला अनिश्चित काळासाठी स्थगिती

आयपीएलला अनिश्चित काळासाठी स्थगिती

भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचा निर्णय

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता बीसीसीआयकडून इंडियन प्रीमियर लीगचा चालू हंगाम स्थगित करण्यात आला आहे.

शुक्रवार दि. ९ मे रोजी रोजी बीसीसीआयच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. आजपासून आयपीएलचा कोणताही सामना होणार नाही. आता बीसीसीआयची पहिली प्राथमिकता परदेशी खेळाडूंना सुरक्षित त्यांच्या घरी पाठवण्याची आहे. बीसीसीआय लवकरच नवीन तारखा जाहीर करेल. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने बुधवारी भारतातील अनेक शहरांवर ड्रोन हल्ले केले. पण, आधीपासूनच तयारीत असलेल्या भारतीय सैन्याने हे सर्व हल्ले परतून लावली आणि पाकिस्तानात घुसून चोख प्रत्युत्तर दिले. रात्री पाकिस्तानने हल्ला सुरू करताच उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला. याचा परिणाम आयपीएलवर दिसून आला.

धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हंगामातील ५८ वा सामना सुरू होता, पण सुरक्षेच्या कारणास्तव सामना थांबवून प्रेक्षकांना स्टेडियम रिकामे करण्यास सांगण्यात आले. अशा युद्धजन्य परिस्थितीत केंद्र सरकार, बीसीसीआय आणि सर्व फ्रँचायझी मालकांशी सल्लामसलत केल्यानंतर आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल रद्द करण्यात आले नाही, म्हणजेच परिस्थिती सामान्य झाल्यानंतर उर्वरित सामने खेळवले जातील. मात्र, हे सामने कधी आणि कुठे खेळवले जातील, याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

लोकसभा निवडणुकीमुळे २०२४ मधील आयपीएलचे सामनेदेखील दोन भागात खेळवण्यात आले होते. पहिला भाग २२ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान चालला, ज्यामध्ये २१ सामने खेळले गेले. निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर, उर्वरित सामने आणि प्लेऑफचे वेळापत्रक तयार करून खेळवण्यात आले. यामुळे स्पर्धा सुरळीत पार पडली आणि कोणतीही अडचण आली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR