मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची दोनच दिवसांपूर्वी विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. मात्र, अवघ्या दोनच दिवसांमध्ये अण्णा बनसोडे यांच्या आमदारकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण त्यांच्या आमदारकीला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवार सुलक्षणा शीलवंत-धर यांनी अण्णा बनसोडेंच्या आमदारकीला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. कोर्टाने बनसोडे यांना दोन एप्रिलाल हायकोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश जारी केले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या वेळेस अण्णा बनसोडे यांनी निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप याचिकेतून सुलक्षणा शिलवंत-धर यांनी केला आहे. अण्णा बनसोडेंनी विधानसभा निवडणुकीत सुलक्षणा शिलवंत धर यांचा तब्बल ३६ हजार ६९८ मतांनी पराभव केला होता.
अण्णा बनसोडेंची राजकीय वाटचाल
अण्णा बनसोडे हे विधानसभेचे विद्यमान उपाध्यक्ष तसेच पिंपरीचे विद्यमान आमदार आहेत. त्यांची राजकीय कारकिर्द पिंपरी-चिंचवड महापालिकेतून नगरसेवक म्हणून सुरू झाली होती. त्यांनी महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील भूषवले आहे. २००९ मध्ये ते पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर आमदारा म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ ला त्यांना शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला होता. मात्र, २०१९ आणि २०२४ मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवत तिस-यांदा आमदार झाले होते.