लेह : भारत खरोखरच स्वतंत्र आहे का? १८५७ मध्ये राणीच्या आदेशानुसार २४००० ब्रिटिशांनी १३५००० भारतीय शिपायांचा वापर करून ३० कोटी भारतीयांवर अत्याचार केले. आताच्या घडीला गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार एक डझन प्रशासक २४०० लडाख पोलिसांचा गैरवापर करून ३००००० लडाख नागरिकांवर अत्याचार आणि छळ करत आहेत अशी घणाघाती टीका सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो वांगचूक यांनी सोशल मीडियावरून केली आहे.
यावेळी गीतांजली यांनी स्थानिक परिस्थितीची तुलना ब्रिटीश सरकारशी करत केंद्रीय गृहमंत्रालयावर जोरदार हल्लाबोल केला. २४ सप्टेंबर रोजी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर लेहमध्ये अजूनही कर्फ्यू आणि पोलिसांचा गोळीबार सुरू आहे असे सांगत गीतांजली अंगमो यांनी गृह मंत्रालय आणि पोलिसांवर टीका केली आहे. गीतांजली अंगमो यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले असून लडाखमधील लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी त्यांनी राष्ट्रपतींना आवाहन केले. तसेच हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही पाठवले आहे. या पत्रात गीतांजली यांनी सोनम वांगचूक यांच्या बिनशर्त सुटकेची मागणी केली.
लेहमध्ये माध्यमांशी बोलण्याचा त्यांचा प्रयत्न रोखला जात असल्याने त्यांना देशासमोर त्यांची बाजू मांडण्यासाठी दिल्लीला यावे लागणार आहे. लेहमध्ये कर्फ्यू आहे आणि इंटरनेट बंद आहे. आम्ही काम करू शकत नाही किंवा माध्यमांशी बोलू शकत नाही. माध्यम कर्मचा-यांना आमच्या संस्थेत, हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज, लडाखदेखील प्रवेश दिला जात नाही. जेव्हा काही पत्रकार आले, तेव्हा सीआरपीएफ कर्मचा-यांनी त्यांचा कॅम्पसमध्ये पाठलाग केला. परिस्थिती अधिकाधिक वाईट होत चालली आहे. आम्हाला अद्याप वांगचूक यांच्या अटकेच्या आदेशाची प्रत देण्यात आलेली नाही आणि स्थानिक अधिकारी फोन कॉल्सही उचलत नाहीत. त्यांच्या प्रकृतीबद्दल मला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर सोनम वांगचूक यांना २६ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. सोनम वांगचूक यांना जोधपूर मध्यवर्ती तुरुंगात पाठवण्यात आले आहे. २४ सप्टेंबरच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात चार जणांचा मृत्यू झाला. संतप्त विद्यार्थ्यांनी भाजप कार्यालय पेटवून दिले होते.