नवी दिल्ली : दिल्ली पोलिस गुन्हे शाखेने शनिवारी एका मोठ्या कारवाईत ‘आयएसआय’पुरस्कृत आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र पुरवणा-या नेटवर्कचा पर्र्दाफाश केला आणि याप्रकरणी चार तस्करांना अटक केली. या नेटवर्कचा उद्देश दिल्ली-एनसीआरमधील टोळ्यांना तुर्कि आणि चीनमध्ये बनवलेल्या अत्याधुनिक पिस्तूलचा पुरवठा करणे हा होता. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून १० अत्याधुनिक पिस्तुले आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त केली आहेत.
जप्त करण्यात आलेली शस्त्रे ड्रोनच्या साहाय्याने पाकिस्तानातून भारतात, विशेषत: पंजाबमध्ये आणली जात होती. त्यानंतर पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील तस्कर ही शस्त्रे दिल्ली आणि आसपासच्या राज्यांतील गुन्हेगारी सिंडिकेटस्ना पोहोचवत होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मनदीप, अजय, दलविंदर आणि रोहन अशी असून ते पंजाब आणि उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत.
आंतरराष्ट्रीय नेटवर्क
हे आरोपी लॉरेन्स बिष्णोई, गोगी, बंबीहा आणि हिमांशू भाऊ यांच्यासारख्या प्रमुख गुंडांच्या टोळ्यांना शस्त्रे पुरवणा-या मॉड्यूलचा भाग होते. या शस्त्रांचा दर्जा आणि पुरवठ्याची व्याप्ती पाहता हे सुव्यवस्थित, आंतरराष्ट्रीय नेटवर्क असल्याचे स्पष्ट होते.
परदेशी सूत्रधाराचा शोध सुरू
एका विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेने रोहिणी परिसरात सापळा रचला आणि पुरवठ्यासाठी आलेल्या आरोपींना अटक केली. सध्या, तपासकर्ते या नेटवर्कद्वारे भारतात किती शस्त्रांचे साठे आले आणि कोणत्या गुन्हेगारी गटांना ते मिळाले, याची तपासणी करत आहेत. या संपूर्ण साखळीतील परदेशी सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी मोबाईल लोकेशन्स, बँक व्यवहार आणि सोशल मीडिया गतिविधींचे विश्लेषण केले जात आहे.

