देइर अल-बलाह : गाझामध्ये इस्रायली हल्ले सुरूच आहेत. आता इस्रायली सैन्याने मध्य गाझामधील मशिदीवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात किमान १८ जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली सैनिकांनी आज पहाटे हा हल्ला केला. पॅलेस्टिनी वैद्यकीय अधिका-यांनी हल्ल्याची माहिती दिली. अल-अक्सा शहीद रुग्णालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, देइर अल-बलाह शहरातील रुग्णालयाच्या मस्जिद अल-मशिदीत आश्रय घेतलेल्या विस्थापित लोकांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला.
सर्व मृत पुरुष असल्याचे रुग्णालयाच्या नोंदींवरून दिसून येते. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, इस्रायली सैन्याकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गाझामधील पॅलेस्टिनी लोकांची मृतांची संख्या आता ४२,००० च्या जवळ पोहोचली आहे. मंत्रालयाने मृतांपैकी किती नागरिक किंवा दहशतवादी होते हे सांगितले नाही, परंतु मृतांपैकी अनेक महिला आणि मुले असल्याचे सांगितले.
दरम्यान, हमास आणि इस्रायलमध्ये गेल्या एक वर्षापासून युद्ध सुरू आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. इस्रायलच्या इतिहासातील हा सर्वांत भीषण दहशतवादी हल्ला होता. हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात काही तासांतच १२०० हून अधिक इस्रायली मारले गेले होते. हमासने २०० हून अधिक लोकांना ओलीस ठेवले होते.