जीनिव्हा : इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यापासून भीषण युद्ध सुरू आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेला हा संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. याच दरम्यान, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ)ने इस्रायलवर आरोप केला आहे की, त्याच्या तपासात उशीर केल्यामुळे गाझामधील एका जखमी रुग्णाला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अदनहोम घेब्रेयेसस यांनी आरोग्य कर्मचा-यांना ताब्यात घेऊन आणि मदत ट्रकवर हल्ला करून गाझामधील आरोग्य आणि बचाव मोहिमांमध्ये व्यत्यय आणल्याचा इस्रायलवर आरोप केला आहे. या सर्व प्रकारामुळे गंभीर जखमी झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला शनिवारी गाझामधील मिशनबद्दल अल-अहली हॉस्पिटलमधून माहिती मिळाली. तपास आणि आरोग्य कर्मचा-यांना बराच काळ ताब्यात घेण्यात आले. आम्ही याबद्दल खूप चिंतित आहोत. अशा कृतींमुळे रुग्णांचा जीव धोक्यात येतो असे टेड्रोस यांनी म्हटले आहे. वादी गाझा चेकपॉईंटवर दोनदा ऑपरेशन थांबवण्यात आले, तर पॅलेस्टिनी रेड क्राइसेंट सोसायटीच्या काही कर्मचा-यांनाही उत्तर गाझाकडे जाताना आणि परत येताना ताब्यात घेण्यात आले असा आरोप केला आहे. कर्मचारी गाजा शहरात आले तेव्हा वैद्यकीय पुरवठा घेऊन जाणारा एक ट्रक आणि रुग्णवाहिकेला गोळीबाराचा फटका बसला.
आरोग्य यंत्रणा सुरक्षित असावी
घेब्रेयेसस पुढे म्हणाले की, एवढेच नाही तर अनेक रुग्ण आणि रेड काइसेंट कर्मचा-यांना रुग्णवाहिकेतून बाहेर काढण्यात आले आणि अनेक तास चौकशी करण्यात आली. इतका वेळ थांबल्याने वाटेतच एका रुग्णाचा मृत्यू झाला. गाझातील लोकांना काळजी घेण्याचा अधिकार आहे. युद्धातही आरोग्य यंत्रणा सुरक्षित ठेवली पाहिजे.