31.2 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeअंतरराष्ट्रीयइस्रायली लष्कराची कारवाई तीव्र; २०० जणांचा मृत्यू

इस्रायली लष्कराची कारवाई तीव्र; २०० जणांचा मृत्यू

जेरुसलेम : इस्रायल आणि हमास यांच्यात हिंसक संघर्ष सुरूच आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात आतापर्यंत २१ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली लष्कराने (आयडीएफ) हमासचे दहशतवादी तळ नष्ट करण्यासाठी हल्ले तीव्र केले आहेत. एका अहवालानुसार, गाझा पट्टीतील खान युनिस येथे इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात गेल्या २४ तासांत २०० हुन अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सच्या सैनिकांनी, जे दक्षिणेकडील शहरात सतत पुढे जात होते, त्यांनी हमासच्या बोगद्यांवर हवाई हल्ले केले. यासोबतच तोफांचे गोळेही डागण्यात आले.

गाझा पट्टीत इस्रायली सैन्याच्या कारवाईबाबत स्थानिक रहिवाशांनी माध्यमांना सांगितले की, इस्रायली रणगाड्यांनी शुक्रवारी रात्री गाझा पट्टीतील खान युनिसवर जोरदार गोळीबार आणि हवाई बॉम्बफेक केली. इस्त्रायली मोहिमेत २४ तासांत जवळपास २०० लोक मारले गेल्याची नोंद आहे. डॉक्टर आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या म्हणण्यानुसार, आयडीएफ विमानांनी मध्य गाझामधील नुसीरत कॅम्पवर अनेक हवाई हल्ले केले.

अडीच महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या युद्धादरम्यान गाझातील २३ लाख लोकांनी सुरक्षित आश्रयस्थानाच्या शोधात आपली घरे सोडून पळ काढला आहे. गाझाच्या आरोग्य अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासह, ७ ऑक्टोबरपासून मृतांची संख्या २१,५०७ वर पोहोचली आहे. याचा अर्थ गाझाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास एक टक्का लोकसंख्या नष्ट झाली आहे. आणखी हजारो मृतदेह अवशेषांमध्ये गाडले गेल्याची भीती आहे.

पत्रकारांना लक्ष्य
कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्स या युद्धग्रस्त भागांवर नजर ठेवणाऱ्या संस्थेने गेल्या आठवड्यात सांगितले की, इस्रायल-गाझा युद्धाचे पहिले १० आठवडे पत्रकारांसाठी सर्वात घातक ठरले. अमेरिकन संस्थेच्या सीपीजेच्या अहवालानुसार, इस्रायली लष्कर विशेषत: पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करत आहे. हा उघड प्रकार अत्यंत चिंताजनक आहे.

पुन्हा अमेरिकेची इस्रायलला मदत
दरम्यान, अमेरिकेने पुन्हा एकदा इस्रायलला मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्या प्रशासनाने संसदीय समितीची मंजुरी न घेता इस्रायलला सुमारे १५ करोड डॉलर किमतीची लष्करी उपकरणे तत्काळ वितरित करण्यास परवानगी दिली आहे. एका अहवालानुसार, या महिन्यात दुसऱ्यांदा असे करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR