नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सूर्याच्या अभ्यासाठी अवकाशात झेपावलेले आदित्य एल-१ हे यान आपल्या इच्छितस्थळी पोहोचले आहे. म्हणजेच आदित्य एल-१ हे यान आज एल-१ बिंदूवर पोहोचले. त्यामुळे इस्रोच्या वैज्ञानिकांचे हे फार मोठे यश असून, यातून सूर्याचा अभ्यास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सूर्याच्या एल-१ बिंदूला हॅलो ऑर्बिट म्हणतात. २ सप्टेंबर २०२३ रोजी इस्रोने आदित्य एल-१ अंतराळात पाठवले होते. त्यामुळे इस्रोच्या वैज्ञानिकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आदित्य एल-१ मध्ये सात पेलोड्स बसवण्यात आले आहेत. यामधील ४ पेलोड्स हे थेट सूर्याचा अभ्यास करणार आहेत तर उर्वरित तीन हे वातावरणाचा अभ्यास करतील. विशेष म्हणजे ग्रहण काळातदेखील सूर्याचा अभ्यास करण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नसल्याचे इस्रोच्या शास्रज्ञांनी सांगितले. सूर्य हा एक तारा आहे. त्यामुळे सूर्यावर सतत काही ना काही स्फोट होत असतात. पण या कोणत्याही स्फोटांचा परिणाम या यानावर होणार नाही. सूर्यामधील अनेक रहस्यांचा उलगडा करण्यास हे यान इस्रोला मदत करणार आहे.
आदित्य एल-१ वरून सूर्याचे पहिले चित्र फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मिळणार आहे. व्हीईएलसीची निर्मिती भारतीय खगोल भौतिकी संस्थेने केली आहे. इस्रोच्या सन मिशनमध्ये स्थापित व्हीईएलसी सूर्याचे एचडी फोटो घेईल. एल-१ पर्यंतचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आदित्यचे सर्व पेलोड्स चालू होतील. म्हणजे त्यात बसवलेली सर्व उपकरणे सक्रिय होतील. त्यानंतर आदित्य सूर्याचा अभ्यास सुरू करेल. या दरम्यान, आदित्यवरील सर्व उपकरणे सुरळीतपणे सुरू आहेत की नाही, याची चाचणीदेखील इस्रोकडून करण्यात येणार आहे. आदित्य एल-१ मध्ये विशेष यंत्रणा तयार करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत यान सूर्याच्या कक्षेत टिकू शकेल. आदित्य एल-१ची रचना खास प्रकारे करण्यात आली आहे, ते सूर्याच्या फार जवळ जाणार नाही, पण लॅरेंज पॉईंटवर राहील आणि या माध्यमातून सूर्याचा अभ्यास करेल, असे सांगण्यात आले.
आदित्य एल-१ लँग्रेज पॉईंटवर
इटालियन-फ्रेंच गणितज्ञ जोसेफ लुई लँग्रेज यांच्या नावावरून लँग्रेज पॉईंट्सची नावे आहेत. सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये पाच लँग्रेंज पॉईंट आहेत. यातील एल-१ वर हे यान पाठवण्यात आले आहे. पृथ्वीपासून एल-१ चे अंतर सुमारे १.५ दशलक्ष म्हणजेच १५ लाख किलोमीटर आहे. म्हणजेच आदित्य-एल-१ पृथ्वीपासून तब्बल १५ लाख किलोमीटर दूर पाठवण्यात आले आहे.
भारताने गाठला मैलाचा दगड
भारताने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. भारताचे पहिलं सूर्यनिरीक्षक यान आदित्य एल-१ आपल्या मुक्कामस्थळी पोहोचले. आपल्या वैज्ञानिकांच्या अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या अंतराळ मोहिमा साकारण्याच्या अथक समर्पणाचा हा पुरावा आहे. या विलक्षण पराक्रमाच्या कौतुक सोहळ््यात मी देशवासीयांसोबत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.