पुणे : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईमध्ये २४ ते २९ सप्टेंबर असे पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई, उपगनर आणि ठाणे परिसरात जोराचा पाऊस पडेल.
पूर्व विदर्भात देखील पाऊस आपली हजेरी लावेल. नागपूरमध्ये २४ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील काही भागात २४ सप्टेंबरपासून पुढचे चार दिवस पावसाच्या जोरदार सरी पाहायला मिळू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. मराठवाडा, विदर्भात चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २२ सप्टेंबरला राज्यात पावसाची शक्यता नाही. पण, २३ सप्टेंबरला मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर २४ तारखेपासून राज्यात पावसाचा जोर वाढेल. २७ सप्टेंबरपर्यंत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला आहे.
देशात मॉन्सूनची स्थिती काय?
येत्या दोन दिवसांत वायव्य भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. २३ सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. २३ सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थान आणि कच्छच्या काही भागांतून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. या भागांतून मॉन्सून माघारी फिरण्याची सर्वसाधारण तारीख १७ सप्टेंबर आहे. बंगालच्या उपसागरात २३ सप्टेंबरला कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता. त्यामुळे महाराष्ट्रात २३-२६ सप्टेंबर दरम्यान पावसाचा अंदाज आहे.