जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिली आहे. ही मुदत जवळ आली असून जरांगे यांनी १७ डिसेंबर रोजी अंतरवली सराटी येथे महत्वपूर्ण बैठक बोलाविली आहे. या बैठकीनंतर पुढची दिशा ठरवली जाणार आहे. दरम्यान या संदर्भात चर्चा करण्यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने शनिवारी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान, ठरल्याप्रमाणे झालेच पाहिजे, सरकारला आतापर्यंत भरपूर वेळ दिला, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला दिलेली वेळ आता पाळलीच पाहिजे, तसेच गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने दिलेला शब्दही पाळला पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. त्यावर आरक्षणाच्या विषयावर जरांगे यांनी जरा सबुरीने घ्यावे असा सल्ला राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिला. त्यावर आतापर्यंत सरकारला भरपूर वेळ दिला असे उत्तर जरांगे यांनी दिले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शासनाची तयारी कुठपर्यंत आली आहे, शिंदे समितीच्या आतापर्यंतच्या अभ्यासाची माहिती या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना दिली.
काळजी घेण्याचे आवाहन
तसेच शिष्टमंडळांने मनोज जरांगे यांच्या तब्येतीचीही चौकशी केली आणि त्यांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. राज्य सरकारच्या शिष्टमंडळात राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे हे होते. त्यांनी जरांगे यांची रुग्णालयात भेट घेतली आणि मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा केली.