कोलकाता : पत्नी आपल्या इच्छेविरोधात जाऊन घरी तिच्या मित्र परिवाराला आणि माहेरच्यांना घरी राहायला बोलवते. इतकेच नाही, आम्ही दोघेही घरी नसतो, तेव्हाही ते आमच्या घरीच राहतात, अशी फिर्याद घेऊन न्यायालयात पोहोचलेल्या पतीच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने निकाल दिला. पतीच्या इच्छेविरुद्ध असे करणे म्हणजे एक प्रकारची क्रूरताच आहे असे न्यायालयाने घटस्फोट मंजूर करताना म्हटले.
न्यायमूर्ती सब्यासाची भट्टाचार्य आणि न्यायमूर्ती उदय कुमार यांच्या खंठपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. कोलकाता उच्च न्यायालयात घटस्फोटाचे प्रकरण आले. दोघाचे लग्न १५ डिसेंबर २००५ मध्ये झाले होते. पत्नी जास्तीत जास्त वेळ आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत राहत होती. २५ डिसेंबर २००८ रोजी पतीने न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. त्याच वर्षी २७ ऑक्टोबर रोजी पत्नीने पती आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
न्यायालयाने निकाल देताना काय म्हटले?
न्यायमूर्ती भट्टाचार्य आणि न्यायमूर्ती कुमार यांच्या खंठपीठाने निकाल देताना म्हटले की, पत्नीकडून पतीसोबत अस व्यवहार होत असल्याचे पुरेसे पुरावे आहेत. त्यामुळे घटस्फोट देणेच योग्य आहे. पतीच्या शासकीय निवासस्थानी त्याचा आक्षेप असताना महिलेने तिच्या मित्रमैत्रिणींना आणि माहेरच्या लोकांना घरात ठेवले. हे रेकॉर्डवरून सिद्ध होत आहे. कधी कधी पती-पत्नी घरी नसतानाही हे ललोक राहत होते, हे क्रूरतेच्याच कक्षेत येते, असे न्यायालयाने म्हटले.
पत्नीचीच चुक
कोलकाता उच्च न्यायालयाने पत्नीची चुक लक्षात आणून दिली असून पत्नी दोषी असल्याचे म्हटले आहे. पत्नी खूप आधीपासून पतीसोबत वैवाहिक आयुष्य जगण्यास नकार देत आहे. दोघांमध्ये ब-याच वर्षांपासून दुरावा निर्माण झाला असून त्यात सुधारणा होण्याची शक्यता नाही. २००५ ते २००८ पर्यंत पत्नी कोणतीही तक्रार न करता राहिली. लग्न झाल्यानंतर पत्नी तिच्या आईसोबत आणि मैत्रिणीसोबत राहत होती. यातून सिद्ध होते की, पतीवर केलेले आरोप आधारहीन आहेत, असेही न्यायालयाने म्हटले.