22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयप्रतिकूल परिस्थितीत कामकाज चालू ठेवणे ही सर्वांची जबाबदारी

प्रतिकूल परिस्थितीत कामकाज चालू ठेवणे ही सर्वांची जबाबदारी

नवी दिल्ली : लोकसभेत शून्य प्रहरात प्रेक्षक गॅलरीतून दोन जणांनी उडी मारल्याच्या घटनेनंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले आहे. याप्रकरणावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, सभागृह कोणीही रोखू शकत नाही. २००१ मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीच्या दिवशी ही घटना घडली. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी सभागृहाचे कामकाज चालू ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. २००१ च्या घटनेनंतरही सभागृहाचे कामकाज चालले, सभागृहाला कोणीही रोखू शकत नाही, असे ते म्हणाले.

शून्य प्रहरात लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन जणांनी खाली(सभागृहात) उडी मारून धूर पसरवला. त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले. यानंतर सभागृहाचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा लोकसभा अध्यक्ष बिर्ला म्हणाले की, शून्य तासाच्या वेळी घडलेल्या घटनेची लोकसभा आपल्या स्तरावर चौकशी करत आहे. या संदर्भात दिल्ली पोलिसांना आवश्यक निर्देशही देण्यात आले आहेत.

ते म्हणाले की, आम्हा सर्वांना चिंता ही होती की, तो धूर कोणता होता, प्राथमिक तपासात तो सामान्य धूर असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. त्या दोन लोकांना पकडण्यात आले आहे. त्यांचे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे आणि बाहेर असलेल्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

यावेळी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, आजच संसदेवर हल्ला झाला होता. आम्ही सर्वांनी शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. ही घटना आजच कशी घडली? आम्ही खबरदारी घेत नाही का? असा सवाल त्यांनी केला. टीएमसी खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, खुल्या सभागृहात याबाबत चर्चा करणे योग्य नाही. मी तुम्हा सर्वांना बोलावत आहे, तुमच्या सूचना जे काही असतील, त्यांचा विचार केला जाईल, असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR