22.1 C
Latur
Saturday, October 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणे चांगले पण दाढीवाल्याला मदत करणे अयोग्य

मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणे चांगले पण दाढीवाल्याला मदत करणे अयोग्य

मनसेची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारने नुकतीच वक्फ बोर्डाला १० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा सध्या चांगलीच वादात सापडली आहे. या मुद्यावरून अनेकजण शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करत आहेत. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळेने महायुती सरकारवर टीका केल्यानंतर आता या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणे चांगले पण दाढीवाल्यांना मदत करणे योग्य नाही, अशी टिप्पणी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केली.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. याविषयी प्रकाश महाजन यांनी, वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये देण्याचा जो शासन निर्णय घेतला आहे, या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहीर निषेध करते. वक्फ बोर्ड ही घटनाबा संस्था आहे. वक्फ बोर्ड एकप्रकारे रद्द करायला पाहिजे.

या देशाचे कायदे या बोर्डाला लागू होत नाहीत. वक्फ बोर्डाने जर एखाद्या जमिनीवर दावा सांगितला तर त्या संबंधित व्यक्तीला न्यायालयात जाता येत नाही, वक्फ बोर्डाकडे जावे लागते. नरेंद्र मोदी यांना या लोकसभेला पुरेसे पाठबळ जनतेने दिले नाही. नाहीतर हा वक्फ बोर्डच रद्द करण्यात आला असता’, असे म्हटले.

लोकसभा निवडणुकीत मते मिळाली नाहीत म्हणून राज्य सरकारकडून अल्पसंख्याक समाजाचे लांगुलचालन केले जात असेल तर ते योग्य नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, वक्फ बोर्डाची बळकटी करण्यासाठी हा निर्णय घेतला. पण मग हे सरकार हिंदूंची वळकटी करणार का?, असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणे चांगले पण दाढीवाल्याला मदत करणे योग्य नाही, असे महाजन यांनी म्हटले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ नियतकालिकातून भाजपला खडे बोल सुनावण्यात आले होते. याची चांगलीच चर्चा झाली होती. याविषयी प्रकाश महाजन यांनी, ‘संघ आणि भाजप यांच्यातील आपसातल्या संबंधावर मनसेने बोलणे योग्य नाही. जर संघ असे बोलत असेल तर भाजपला आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. जर संघ टीका करत असेल तर इतर कोणी भाजपवर टीका करण्याची गरज नाही. संघाने जर भाजपला सल्ला दिला असेल तर तो सल्ला नसतो आदेश असतो, असे म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR