24.3 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeमहाराष्ट्रआठवड्यातील किमान तीन दिवस मंत्रालयात हजेरी लावणे अनिवार्य

आठवड्यातील किमान तीन दिवस मंत्रालयात हजेरी लावणे अनिवार्य

प्रशासकीय निर्णय वेळेत घ्या ! मुख्यमंत्र्यांचे सर्व मंत्र्यांना आदेश जारी अधिका-यांनाही कामाला लावले सात कलमी कार्यक्रम दिला !

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत लोकांनी आपल्यावर विश्वास दर्शवून मोठे बहुमत दिले आहे. त्यामुळे आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. खात्याची कामे गतीने पूर्ण झाली पाहिजेत. त्यासाठी आठवड्यातील किमान तीन दिवस मंत्रालयात उपस्थित राहा. उर्वरित चार दिवसात मतदारसंघ व बाहेरील दौ-याचे नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दिल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या महायुतीचे सरकार स्थिरस्थावर व्हायला तब्बल दीड महिना लागला आहे. सर्व मंत्र्यांनी खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना पुढच्या काळात अधिक जबाबदारीने काम करण्याची सूचना दिली. सर्वांनाच आपल्या खात्याबरोबरच मतदारसंघासाठी वेळ द्यावा लागतो. मतदारसंघांचा विकासासह राज्यातील विकासकामांकडेही लक्ष द्याव लागते. मंत्री हा संपूर्ण राज्याचा असतो. त्यामुळे मंत्र्यांनी आपल्या वेळेचे योग्य नियोजन करावे. दर आठवड्यात किमान तीन दिवस मुंबईत थांबा. लोकांच्या कामासाठी मंत्रालयात भेटा. उरलेल्या दिवसांत मतदारसंघातील कामांचे नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिल्याचे समजते.

अधिका-यांसाठी सात कलमी कार्यक्रम
सर्वसामान्य नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका कार्यालय ते पोलिस ठाणे आदी शासकीय कार्यालयांमध्ये दैनंदिन कामांसाठी संबंध येत असतो. आता या सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे ( ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व अधिका-यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. याच्या अंमलबावणीचा आपण स्वत: १५ एप्रिल नंतर आढावा घेणार असल्याची तंबीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

संकेतस्थळे सुसज्ज करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करावे, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी. संकेतस्थळ सायबरदृष्टया सुरक्षित करावे. शासकीय कार्यालयांची स्वच्छता करावी, अनावश्यक कागदपत्रे काढून टाकावी, खराब आणि वापरात नसलेली वाहने भंगारात काढण्यात यावीत.

कार्यालयात येणा-या नागरिकांना सेवा द्या
शासकीय कार्यालयात येणा-या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहतील, हे सुनिश्चित करावे. अधिका-यांच्या अचानक भेटी होतील, त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर (ईज ऑफ लिव्हिंग) व्हावे यासाठी किमान दोन सुधारणा, नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबविण्यात यावेत. प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल, याचा प्रयत्न करावा. अधिकारी नागरिकांना कधी उपलब्ध असतील याची माहिती फलकावर नमूद करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

स्थानिक पातळीवरच प्रश्न सोडवा
नागरिकांचे स्थानिक पातळीवर सुटू शकणारे प्रश्न, समस्या तालुका, जिल्हा स्तरावरच सोडवावेत. पण असे होत नसल्याने मंत्रालयात गर्दी होते. यासाठी लोकशाही दिन सारखे उपक्रम प्रभावीपणे राबविले जावेत, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील विविध ठिकाणी गुंतवणुकीसाठी उद्योजक येतात. त्यांना कसलाही आणि कोणाकडूनही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. हे केवळ उद्योग विभागाचे काम नाही तर क्षेत्रीय अधिकारी यांचेही काम आहे. (इज ऑफ वर्किंग) यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांचे अधिकारी आणि उद्योजक यांच्याशी संवाद साधावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

अधिका-यांसाठीची सप्तसुत्री
१) विभाग, कार्यालयाचे संकेतस्थळ अद्ययावत करावे.
२)‘ईज ऑफ लिव्हिंग’ संकल्पनेवर काम करावे.
३) शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवावी.
४) नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी.
५) उद्योजकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
६) शासनाच्या महत्वाच्या प्रकल्प आणि योजनांच्या प्रकल्पांना भेटी द्याव्यात.
७) शासकीय कार्यालयात येणा-या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR