पुणे : प्रतिनिधी
गायनामध्ये साथ संगत करताना स्केल चेंजर हार्मोनियमने ज्याप्रमाणे स्वर (पट्टी) बदलता येते त्याप्रमाणेच आता बासरी वादकालाही बासरी या वाद्यावर स्वर पट्टी बदलणे शक्य होणार आहे, असे बासरीवादक महामहोपाध्याय डॉ. पंडित केशव गिंडे पत्रकार परिषदेत म्हणाले.
संगीत क्षेत्रामध्ये गायनाबरोबरच हार्मोनियम व तंतुवाद्यात विशेषत: सतार, सरोद व वीणा आदी वाद्यांमध्ये स्वर(पट्टी) बदलता येणे शक्य असते, परंतु आजपर्यंत बासरी वादनात स्वरांच्या पट्टीतील बदलानुसार अनेक बास-यांचा वापर करावा लागतो.
नवीन संशोधनानुसार, पांचजन्य वेणू या एकाच बासरीवर (५० हर्टझ्) म्हणजे तीन ते चार पट्ट्यांमध्ये बासरी वाजविणे शक्य झाले आहे. नवनिर्मित पांचजन्य वेणू (बासरी) मुळे एकाच बासरीवर पांढरी चार, पांढरी तीन, काळी दोन व पांढरी दोन या स्वरांखेरीज अनेक स्वरांमध्ये बासरी वादन करणे सुलभ झाले असून ही बासरी पीव्हीसी पाईप (प्लास्टिक) व कार्बन फायबर अशा दोन घटकांचा उपयोग करून बनवण्यात आली आहे.
संशोधनामुळे बासरी वादकाला आता अनेक बास-यांचा संच जवळ बाळगण्याची आवश्यकता नसून केवळ एकाच बासरीतून तीन ते चार स्वरां (स्केल)पर्यंत बासरी वादन करता येणे शक्य होणार आहे. बासरी वादन करताना हवामानाच्या बदलामुळे बासरीच्या स्वरात (पट्टीत) बदल होत असतो, मात्र आता पांचजन्य वेणूच्या निर्मितीत प्लास्टिक व कार्बन फायबर वापरल्यामुळे स्वरांच्या (पट्टीत) हवामानाच्या बदलाचा काहीही परिणाम होत नाही, असे ते म्हणाले.