36.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeलातूरसंविधान बदलणार हा विरोधकांकडून अपप्रचार : मंत्री संजय बनसोडे

संविधान बदलणार हा विरोधकांकडून अपप्रचार : मंत्री संजय बनसोडे

 औसा : संजय सगरे

इंडिया आघाडीचे लोक तुम्हाला येऊन सांगत आहेत लोकशाही धोक्यात येणार आहे. भाजपचे ४०० पार झाल्यावर बाबासाहेबांचे संविधान बदलणार आहे. तुमचे आरक्षण रद्द होणार आहे असे सगळे खोटे बोलून अपप्रचार केला जात आहे. आम्हीही महाविकास आघाडीत असताना हेच बोलायचो कारण आम्हाला वरून सांगितले जायचे ‘मुस्लिम खतरे में है…’ मला मुस्लिम बांधवांनी सांगावे या दहा वर्षांत त्यांना काय त्रास दिला.. त्यामुळे अल्पसंख्याक समाजाने कुठेही असुरक्षिततेची भावना मनात आणू नये. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक योजना जात-धर्म बघून दिली गेली नाही.देश झपाट्याने विकासाकडे जात असताना विकसित भारत बनविण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यामुळे आपले सर्वांचे कर्तव्य आहे नरेंद्र मोदी यांना तिस-यांदा पंतप्रधान करून देशाला महासत्तेकडे घेऊन जायचे. संविधान व आरक्षणाबाबत इंडिया आघाडीकडून दिशाभूल केली जात आहे. संविधान बदलणार हा विरोधकांकडून अपप्रचार असल्याचे मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

औसा येथील गांधी चौकात दि. ३ रोजी उस्मानाबाद (धाराशिव ) लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सौ. अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री बसवराज पाटील, लातूरचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे लातूर जिल्हाध्यक्ष माजी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख, माजी नगराध्यक्ष किरण उटगे, माजी नगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय कोळपे आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री संजय बनसोडे पुढे म्हणाले की, नामांतराच्या काळातील मी एक कार्यकर्ता आहे. याच उबाठातील लोकांनी नामांतराला विरोध केला होता. बाबासाहेबांच्या संविधानाने लोकशाही मजबूत करण्याचे एवढे मोठे काम केले. त्यांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी काँॅग्रेस सरकारने उशीर का केला, असा सवाल उपस्थित करून बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न व्ही. पी. सिंग आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी दिल्याचे सांगून या देशात संविधान दिन साजरा करण्याचे नरेंद्र मोदी यांच्या काळापासून सुरू करण्यात आले. नामांतर हे आमचे ध्येय होते तसे बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलच्या ठिकाणी भव्यदिव्य स्मारक उभे राहावे हे ध्येय आहे. ही जागा मिळवून देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. हे स्मारक उभे करण्याचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले असून या ठिकाणी आता भव्यदिव्य स्मारक उभे करण्याची जबाबदारी माझी आहे. याचबरोबर बाबासाहेबांचे जन्मगाव महू तसेच त्यांच्या आंबेवाडी येथील घर व शाळा येथेही हजारो कोटींच्या निधीतून विकास कामे केली जात आहेत. त्यामुळे आपले एकही मत वाया न जाऊ देता आपले मत विकसित भारताच्या निर्मितीसाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना द्यायचे आहे, असे आवाहन यावेळी बोलताना कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी केले.

ते पुढे असेही म्हणाले की, कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मला कॅबिनेट मंत्री केले आहे हा माझ्या समाजाला दिलेला सन्मान असून राममंदिर उभारणीनंतर नरेंद्र मोदी यांनी आता रामाकडून राष्ट्राकडे आणि देवाकडून देशाकडे ही संकल्पना मांडली. ही संकल्पना म्हणजे आपल्या देशातील प्रत्येक समाज घटकाला पुढे घेऊन जायची आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समाजाला त्यांनी एक विश्वास दिला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा, पंतप्रधान घरकुल योजना, शौचालये, मोफत धान्य, उज्ज्वला गॅस योजना यासह अनेक योजना गरज बघून समाजातील प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांना देण्यात आली आहे. राज्यात दर्जेदार रस्तेविकासाचे जाळे निर्माण झाले आहे. नवनवे उद्योग उभे राहत आहेत. देश झपाट्याने विकासाकडे जात असताना विकसित भारत बनविण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यामुळे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, नरेंद्र मोदी यांना तिस-यांदा पंतप्रधान करून देशाला महासत्तेकडे घेऊन जायचे. यावेळी आमदार अभिमन्यू पवार व माजी मंत्री बस्वराज पाटील यांनीही आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या विकास कामाबद्दल बोलून महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR