मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची चर्चा सुरू असतानाच चैत्यभुमीवरील कार्यक्रमात त्यांचे भाषण रद्द करण्यात आल्याने वेगळीच चर्चा सुरू झाली होती. परंतु शिंदे यांनी भाषणापेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन माझ्यासाठी मोठे होते, अशी प्रतिक्रिया देताना भाषण का केले नाही या प्रश्नाला बगल दिली.
चैत्यभूमीवरील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण होणार होते. मात्र, ऐनवेळेस नियोजित भाषण रद्द करण्यात आले. यामुळे ते नाराज झाले अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु चैत्यभूमीला जाणे, डॉ. बाबासाहेबांचे दर्शन घेणे आणि त्यांना अभिवादन करणे, यापेक्षा दुसरे मोठे काय असू शकते. त्यामुळे बाबासाहेबांची जयंती चैत्यभूमीला साजरी झाली आणि आम्ही तिथे सर्वजण गेलो होतो. त्यानंतर ठाण्यातही जयंती कार्यक्रमाला उपस्थित होतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सर्वोत्तम घटना दिली. प्रत्येकाने बाबासाहेबांचा एक तरी गुण घेतला पाहिजे. त्यामुळेच मी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करताना म्हणालो होतो की, तुमच्यातील एक अंश जरी मिळाला तर हे मनुष्य जीवन सार्थक होईल आणि समाजसेवा करायला उर्जा आणि प्रेरणा मिळेल, त्यापेक्षा दुसरे काय महत्वाचे, असे त्यांनी सांगितले.
विरोधकांवर टिका
काही लोक संविधानाची प्रत दाखवून ते बदलणार असल्याचे म्हणत होते. परंतु बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान एवढे मजबूत आहे की ते बदलले जाऊ शकत नाही. संविधान हे कायमच राहील. काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांना पराभुत करण्याचे काम केले. त्यांना त्रासही दिला. परंतु २०१४ साली नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले आणि ख-या अर्थाने संविधान दिन साजरा होऊ लागला. यापुर्वी संविधान..संविधान म्हणत काही लोक गळा काढत होते, अशी टिका त्यांनी विरोधकांवर केली.